मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील उपनगरीय लोकलमध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले असून दररोज सरासरी ३५ मोबाइल चोरीला जात आहेत. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे २०२४ मध्ये ११ हजार, तर चालू वर्षातील पाच महिन्यांत साडेतीन हजार मोबाइल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत मागील ५ वर्षांत चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यात येणार आहे.
रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन चोर मोबाइल चोरत आहेत. लोकलमधून २०२४ मध्ये ११ हजार १४३ मोबाइल चोरण्यात आले. म्हणजेच महिन्याला साधारण ९५० आणि दिवसाला सरासरी ३० मोबाइल चोरीला गेले. चालू वर्षातील जानेवारी ते मे या कालावधीत ३ हजार ५७६ मोबाइलची चोरी झाली. या वर्षीही महिन्याला ७०० हून अधिक मोबाइल चोरण्यात आले आहेत.
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल संथ
एकीकडे मोबाइल चोरीचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण मात्र संथ आहे. मोबाइल चोरीच्या २०२४ मधील ११ हजार १४३ गुन्ह्यांतील केवळ ५ हजार १६२ प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले आहे. चालू वर्षातील ३ हजार ५७६ पैकी केवळ १ हजार ४७३ प्रकरणांची उकल झाली आहे. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण जेमतेम ५० टक्के आहे.
रेल्वे पोलिसांची विशेष मोहीम
मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाइलचा तांत्रिक तपास करून तो परत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय मोबाइल चोरांच्या टोळ्यांचा तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिली.
लोकलमध्ये चढताना मोबाइल चोरण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकल पकडताना गर्दीचा फायदा घेताला जातो. अनेक जण बोलताना गाफिल असतात. त्यामुळे खिशातून अलगद मोबाइल काढला जातो. ट्रेनमध्ये दाराजवळ बोलत उभे असणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल हिसकावून घेण्याचे प्रकार वाढल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.