मुंबई : पुरस्कार विजेते वन्यजीव छायाचित्रकार, पर्यावरणवादी आणि लेखक संजॉय मोंगा यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. संजॉय मोंगा हे अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करीत होते. त्यांनी वन्यप्राणी आणि पर्यावरणासंबंधीत अनेक लेख आणि पुस्तकेही लिहिली आहेत. मागील सहा वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. संजॉय मोंगा यांनी हुमायून अब्दुलअली आणि सलीम अली यांसारख्या दिग्गजांसोबत पक्षी निरीक्षणाचा प्रवास सुरू केला. त्यावेळी पक्षीप्रेमींसाठी फक्त दोनच पुस्तके उपलब्ध होती. पुढे मोंगा यांनी सर्वांना समजतील अशी पक्षी निरीक्षणावरती विविध पुस्तके लिहिली.
पक्षीप्रेमींसाठी दरवर्षी पर्वणी ठरणारी ‘बर्ड रेस’ ही पक्षी निरीक्षण स्पर्धा मोंगा यांनी २००५ मध्ये सुरू केली. बर्ड रेस हा पक्षी निरीक्षणाचा देशांतील सर्वात मोठा उपक्रम म्हणून ओळखला जातो. या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील पक्ष्यांची स्थिती, कोणत्या नव्या प्रजाती आढळल्या याचीही नोंद होते. आता हा कार्यक्रम ‘विंग्स- बर्ड्स रेस ऑफ इंडिया’ या नावाने आयोजित केला जातो. भारतातील १४ शहरांमध्ये पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात येते. दरम्यान, संजॉय मोंगा यांनी उरणमधील नष्ट होणाऱ्या पाणथळ जागांवर प्रकाश टाकला होता. याविषयी त्यांनी विविध माध्यमांमध्ये लेखनही केले होते. यानंतर २००७ मध्ये मोंगा यांनी ‘यंग रेजर्स’ नावाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण, निसर्ग, जंगल याविषयी माहिती देण्यास सुरुवात केली होती. काही वर्षांनी हा कार्यक्रम बंद करण्यात आला.
संजॉय मोंगा हे महाराष्ट्र निसर्ग उद्यान कार्यकारी समितीचे सदस्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव अधिकारी होते. तसेच अनेक वर्ष ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सदस्यही होते.