मुंबई विद्यापीठाचे बहुतांश नवे अभ्यासक्रम सदोष, जागतिक दर्जाच्या निव्वळ बाता
जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम तयार करण्याचा दावा करणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या काळात मुंबई विद्यापीठाचे ‘मास्टर ऑफ कॉमर्स’ (एमकॉम) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सध्या ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’ (बीकॉम) या पदवीचा म्हणजेच निम्न स्तरावरील इयत्तेचा अभ्यास करीत आहेत. केवळ एमकॉमच नव्हे तर बहुतांश सर्वच विषयांच्या नव्या अभ्यासक्रमांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी राहिल्याने त्यात सुधारणा करण्याची मागणी प्राध्यापकांकडून होत आहे.
विद्यापीठाचे अभ्यासक्रम ‘जागतिक स्तरा’चे करण्याचा संकल्प देशमुख यांनी सोडला आहे. परंतु, त्याकरिता अवघ्या महिन्याभराची मुदत त्या त्या विषयाच्या अभ्यास मंडळांना देण्यात आली होती. याच गडबडीत बीकॉमच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमातील बहुतांश भाग उचलून एमकॉमचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ एमकॉमच्या (भाग-१) बिझनेस इकॉनॉमिक्सचा ७०टक्के अभ्यासक्रम एफबायबीकॉम आणि एसवायबीकॉममधील विषयांवर आधारित आहे. पदव्युत्तर स्तरावरील फारच थोडा भाग एमकॉममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, असे या विषयातील पदव्युत्तर विषयाच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.
हाच प्रकार इतरही विषयांच्या पेपरचा आहे. त्यामुळे, काही प्राध्यापक कुलगुरूंकडे तक्रार करून अभ्यासक्रम मागे घेण्याची मागणी करीत आहेत.
दुसरीकडे अभ्यासक्रम बदलाच्या नावाखाली भौतिकशास्त्र आणि गणित यांचा एखाददुसरा धडा किंवा प्रश्नपत्रिकाच बदलण्यात आली आहे. केवळ याच नव्हे तर बहुतेक सर्वच अभ्यासक्रमांमध्ये विविध त्रुटी राहिल्याची प्राध्यापकांची तक्रार आहे. अधिसभा (सिनेट) बरखास्त झाल्याच्या नावाखाली सर्व अभ्यासमंडळेही बरखास्त करण्याचा विद्यापीठाचा घिसाडघाईचा निर्णयच या गोंधळाला कारणीभूत असल्याचा आरोप बुक्टू या प्राध्यापक संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. मधू परांजपे यांनी केला.
बुक्टूचे पत्र
अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी मंडळांवर असते. जुन्या मंडळांना मुदतवाढ देऊन काम करून घेण्याऐवजी तात्पुरती आणि अपात्र सदस्यांचा समावेश असलेली अभ्यास मंडळे स्थापन करण्यात आली. मंडळावरील नेमणुका या कुलगुरूंनी आपल्या अधिकारात केल्या आहेत. परंतु, मर्जीतील सदस्यांची त्यावर वर्णी लावण्यात आल्याने अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न धूळफेक करणारा ठरला आहे आणि भविष्यात तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरेल, असे प्राध्यापकांनी बुक्टूमार्फत कुलगुरूंना पत्र लिहून निदर्शनास आणून दिले आहे.
याचे काय करायचे?
- एफवायबीएमएममध्ये प्रत्येक साहित्य प्रकारात कुठला लेखक, कवी, कादंबरीकार शिकवायचा याचे स्वातंत्र्य प्राध्यापकांना आहे. परंतु, पहिल्या वर्षांसाठी विद्यापीठच सर्व महाविद्यालयांकरिता एकच प्रश्नपत्रिका काढणार आहे. प्राध्यापक वेगवेगळे साहित्यिक शिकवीत असतील तर सारखी प्रश्नपत्रिका कशी काढता येईल?
- बीएस्सीचे जैव-तंत्रज्ञान आणि संगणक सायन्स हे विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र या मूळ विषयांपासून पूर्णपणे तोडण्यात आले आहेत.
- अनुभवी शिक्षक असतानाही समाजकार्य विषयाच्या अभ्यासमंडळात समाजशास्त्राच्या प्राध्यापकांचा समावेश. नाही तसेच, यात महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेशच नाही.