मुंबई : विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या वेळापत्रकानुसार विधी पाच वर्ष आणि बीए, बीएस्सी बीएड इंटीग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) घेण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याची टीका पालक व विद्यार्थी संघटनांकडून हाेत आहे. सीईटी कक्षाने संभाव्य वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला होता. त्यानुसार आता विधि पाच वर्ष आणि बीए / बीएस्सी बीएड इंटीग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>CNG PNG Prices in Mumbai : मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार?

विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची अंतरिम यादी १५ जुलै रोजी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर १५ ते १७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. या काळात अर्ज दुरुस्ती करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. त्यानंतर अंतिम यादी १९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गतवर्षी एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल होता. बीए / बीएस्सी बीएड चार वर्षांच्या इंटीग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी अंतरिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलै रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, सीईटी सेलने पसंतीक्रम देण्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही.

असे आहे वेळापत्रक

एलएलबी पाच वर्ष

– ऑनलाईन अर्ज भरणे – १३ जुलैपर्यंत

– कागदपत्रे तपासणी व अर्ज निश्चित करणे – १४ जुलैपर्यंत

– अंतरिम यादी- १५ जुलै

– हरकती व सूचना- १५ ते १७ जुलै

– अंतिम यादी- १९ जुलै

बीए/ बीएस्सी – बीएड चार वर्ष इंटीग्रेटेड

– ऑनलाईन अर्ज भरणे – ११ जुलैपर्यंत

– कागदपत्रे तपासणी व अर्ज निश्चित करणे – १२ जुलैपर्यंत

– अंतरिम यादी- १३ जुलै

– हरकती व सूचना- १२ ते १४ जुलै

– अंतिम यादी- १५ जुलै