समीर कर्णुक

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बकरी ईद निमित्त पालिकेकडून देवनार पशुवधगृहात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याने याचा फटका बकऱ्यांना बसू नये यासाठी पालिकेने यावर्षी खास खबरदारी घेतली आहे. शिवाय चोरीच्या घटना रोखण्यासाठी बारकोड पास आणि व्यापाऱ्यांसाठी पशुवधगृहातच बँकेची सुविधा देखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या १२ ऑगस्टला मुंबईसह देशभरात बकरी ईद साजरी होणार आहे. त्यासाठी देवनार पशुवधगृ सज्ज झाला असून बुधवारपासून या ठिकाणी बकऱ्यांची आवक देखील सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी देवनार पशुवधगृहात १८ हजार ५७७ इतके बकरे दाखल झाले. बकरी ईदपर्यंत हा आकडा दोन ते अडीच लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ६४ एकर जागेत वसलेल्या या देवनार पशुवधगृहात या वर्षी ९० हजार चौरस मीटर जागा खास बकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा विविध राज्यातून या ठिकाणी बकऱ्यांच्या विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना देखील याच ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय मुबलक पाणी, आरोग्य आणि विजेची देखील सोय पालिकेने केली आहे. संपूर्ण परिसरात सीसी टीव्ही, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी देवनार पशुवधगृहात मोठय़ा प्रमाणात बकऱ्यांची चोरी होते. त्यानंतर हेच बकरे विक्रीसाठी येतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने यावर्षी प्रत्येक व्यापाऱ्याला स्मार्ट ओळखपत्र दिले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांची सर्व माहिती, त्याने विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्यांची माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे ओळखपत्र नसलेली व्यक्ती याठिकाणी बकरी विकू शकणार नाही. तर बकरी विकत घेणाऱ्या ग्राहकाला देखील याठिकाणी बारकोड असलेले गेट पास देण्यात येणार आहेत.