दूरचित्रवाणी, संगणक, मोबाइल खेळ यातच मुलांनी गुंतून राहू नये म्हणून पालक उन्हाळी, दिवाळी अशा दीर्घकालीन सुट्टीत मुलांना छंदवर्गाना ‘चिकटवितात’. ‘चिकटवितात’ यासाठी म्हणायचे कारण अनेकदा आपल्या मुलाने कोणत्या प्रकारचा छंद जोपासायला हवा याचा फारसा विचारच पालकांनी केलेला नसतो. असा छंद की जो आयुष्यभर त्याच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्याबरोबरच भविष्यात ताणतणावांमधून त्याची मुक्तताही करेल. परंतु, केवळ मुलांना कुठेतरी अडकवून ठेवण्याकरिता म्हणून छंद वर्गाचा विचार होतो आणि त्यातूनच पेव फुटते ते पाश्चात्य नृत्य, अबॅकस, क्रिकेट, स्केटिंग अशा ठरावीक वर्गाचे. नेमक्या याच कोलाहलात चर्नीरोडचे ‘महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन’ जवळपास ३५ प्रकारची वेगवेगळी कलाकौशल्ये एकाच छत्राखाली मुलांना उपलब्ध करून देते. मुंबई शहरापुरते मर्यादित असलेले छंदवर्गाचे हे अवकाश लवकरच उपनगरातही मुलांकरिताही खुले होणार आहे. त्या विषयी सांगत आहेत, जवाहर बालभवनचे संचालक संदीप संगवे.

संदीप संगवे, संचालक, बालभवन

Divorce propaganda songs Kawan no New Indian Pop Stars This book
द्वेषाचे सुरेल दूत..
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

’ दरवर्षी बालभवन विद्यार्थ्यांकरिता सुट्टीत विविध प्रकारचे छंदवर्ग घेऊन येते. यंदा त्यांना प्रतिसाद कसा होता?
प्रत्येकी दहा दिवस याप्रमाणे २० एप्रिल ते १ जून या दरम्यान बालभवनने एकूण तीन सत्रे घेतली. ३४ छंदवर्ग यात होते. मुलांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले जाते. माफक शुल्कात तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. सर्जनशीलता, शारीरिक कौशल्य आणि बौद्धिक या तीन प्रकारात छंद वर्गाची विभागणी केली होती. सृजनशीलता विभागात कॅलिग्राफी, वारली पेंटिंग, चित्रकला, फोटोग्राफी, शिल्पकला, सितार, तबला, पाश्चात्त्य नृत्य आदी शिकण्याची संधी मिळते. मुले एका जागी बसून राहू नये यासाठी त्यांना शारीरिक खेळांमध्ये गुंतविले जाते. त्या करिता स्केटिंग, अ‍ॅरोबिक्स, योग, मल्लखांब, क्रिकेट यांचे प्रशिक्षण दिले जाते, तर बौद्धिक वर्गामध्ये अ‍ॅबॅकस, बुद्धिबळ, संभाषण आणि भाषण कौशल्य, मराठी आणि इंग्रजी सृजनात्मक लिखाण यांचा समावेश असतो.
’ मुलांचा ओढा नेमका काय शिकण्याकडे होता?
सृजनशीलता आणि शारीरिक कौशल्य या विभागांमध्ये येणाऱ्या विषयांकडे मुलांचा ओढा अधिक होता. त्यातही पाश्चात्त्य नृत्य, स्केटिंग, क्रिकेट हे विषय त्यांना अधिक भावतात, असे दिसते. बौद्धिक विषयांकडे तुलनेत विद्यार्थी कमी आकर्षित होत आहेत. त्यातही अ‍ॅबॅकस हे गणितातील गणन तंत्र शिकविणारा विषय घ्यावा असे बहुतांश विद्यार्थ्यांना वाटते. बौद्धिक खेळांकडे कल कमी असणे हा ट्रेंड तसा पूर्वीपासूनच आहे. पण आजकाल तो चांगला जाणवतो आहे. आमच्याकडे तिसऱ्या सत्रात सतार शिकण्याकरिता म्हणून केवळ दोन ते तीन विद्यार्थी आले होते. त्यामुळे, आम्हाला हा वर्गच घेता आला नाही. मराठी भाषा हसतखेळत शिकविण्याकरिता आम्ही जे वर्ग घेतो त्याला फारच कमी प्रतिसाद मिळाला. यंदा तर संगणकालाही प्रतिसाद नव्हता. शाळेत किंवा घरी संगणक असल्याने विद्यार्थ्यांना त्याची मूलभूत ओळख आहे. संगणकातही अ‍ॅप किंवा वेब पेज डिझायनिंग शिकविले तर ते त्यांना आवडेल. त्या दृष्टीने पुढील वर्षी बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
’ बुद्धीला आव्हान देणारे छंद जोपासण्यात मुलांना का रस वाटत नाही?
कलांची रुजवणूक बालवयातच चांगली होते. कलासक्त मुले संवेदनशीलही असतात. ती वेगळ्या अंगाने विचार करून आपल्यातील सर्जनशीलतेचा फायदा अभ्यासातही करून घेतात. अर्थात कोणतीही कला, त्यातही बौद्धिक, ही जोपासावी लागते. काही कला तर बैठक पक्की करून जोपासल्या तरच त्यात नैपुण्य मिळविता येते. तुलनेत पाश्चात्त्य संगीतावरील नृत्य लगेच आत्मसात करता येते. त्यावर मुलांना नाचताना पाहून पालकही हरकून जातात. अशा अनेक कारणांमुळे बुद्धीला आव्हान देणाऱ्या छंदांमध्ये मुलांना रस वाटत नाही.
’ शाळा आणि समाजाला जोडण्याचे काम बालभवन करते ते कसे?
मुंबईसारख्या शहरांमध्ये जागेच्या अडचणीमुळे ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती अनुसरण्यात अडचणी येतात. बालभवनकडे स्वत:चे उद्यान आहे. वनस्पतीशास्त्र शिकण्याकरिता उद्यानासारखी चांगली जागा नाही. शेजारीच समुद्रकिनारा आहे. मत्स्यालय, नेहरू विज्ञान केंद्र आहे. या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणीही नेले. जवळच्याच राज्य विज्ञान संस्थेच्या माध्यमातून काही प्रयोग विद्यार्थ्यांना पाहता आले. शाडूच्याच नव्हे तर कागदी लगद्यापासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण आम्ही मुलांना देतो. पण, त्याचवेळेस शाडूची मातीच का वापरायची, प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरण्यात कोणते धोके असतात, कोणत्या कारणांमुळे ते पाण्यात विरघळत नाही हे त्या अनुषंगाने सांगतो. म्हणजे कृतिशीलतेबरोबरच विज्ञान, पर्यावरणही येते. आमच्या कार्यशाळांमधून ज्ञानरचनावाद साधला जातो तो असा. त्यातून शाळेचे आणि बालभवनचे विषय सारखेच आहेत. अशा विविध मार्गानी शाळा आणि समाजाला जोडण्याचे काम बालभवन करते.
’ बालभवनचे कार्य तसे सुट्टीपुरतेच मर्यादित राहते.
नाही. आपण केवळ सुट्टीमध्ये छंदवर्ग घेऊन मोकळे होत नाही, तर वर्षभर आपल्याकडे कार्यक्रम सुरू असतात. आता बालभवनने आपली भूमिका बदलली आहे. केवळ सुट्टीत मुलांनी गुंतून राहावे यासाठी नव्हे तर इथे येऊन अवगत केलेली कला, कौशल्य पुढे विकसित करण्याच्या दृष्टीनेही बालभवन मार्गदर्शन करते आहे. त्यामुळे वर्षभर शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत बालभवनने आपली दारे विद्यार्थ्यांकरिता खुली ठेवली आहेत. या शिवाय अखिल भारतीय नाटय़ संमेलन, राज्य नाटय़ स्पर्धा, मराठी साहित्य संमेलन, केंद्रीय बालभवनच्या राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले कार्यक्रम, पर्यावरणविषयक परिषद आदी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. बालभवनला येणारी मुले शालेय स्तरावरही चांगली कामगिरी करतात.
’ बालभवनच्या या उपक्रमांपासून उपनगरातील मुले वंचित राहतात.
बालभवनची आठ-दहा उपकेंद्रे उपनगरात होती. त्यांना बालभवन निधी आणि मार्गदर्शक तज्ज्ञांचे पाठबळही उपलब्ध करून देत असे. मधल्या काळात निधी देण्याची पद्धत बंद पडली. परंतु, या केंद्रांचे पुनरुज्जीवन करता येईल. बऱ्याचशा अनुदानित शाळा आहेत. त्यांचाही वापर या केंद्रांकरिता येईल. येथे येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बससेवा उपलब्ध करून देण्याचाही विचार होऊ शकतो.
मुलाखत – रेश्मा शिवडेकर