दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७ ते २०११ या कालावधीत आठ ते नऊ वेळा इच्छापत्र केले होते, असा खुलासा बाळासाहेबांची सर्व इच्छापत्रे तयार करणारे वकील फ्लेमिनीन डिसोजा यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर झालेल्या साक्षीदरम्यान केला.
बाळासाहेब ठाकरे दहशतवादी नव्हते का?- मुशर्रफ
उद्धव आणि जयदेव या ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या इच्छापत्रावरून सुरू असलेल्या दाव्याच्या नियमित सुनावणीला न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर गुरुवारपासून सुरुवात झाली. त्या वेळेस पहिला साक्षीदार म्हणून डिसोजा यांची साक्ष नोंदविण्यात येऊन जयदेव यांच्या वकिलांकडून घेण्यात आलेल्या उलटतपासणीच्या वेळेस त्यांनी हा खुलासा केला. बाळासाहेबांच्या ज्या इच्छापत्रावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद सुरू आहे. त्याचे साक्षीदार म्हणून त्यांची त्यावर स्वाक्षरी आहे. याशिवाय डॉ. जलील परकारही या इच्छापत्राचे साक्षीदार आहेत. उलटतपासणीच्या वेळेस डिसोजा यांनी इच्छापत्राबाबत बऱ्याच बाबी उघड केल्या. १९८८ साली वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्या डिसोजा यांनी १९९७ मध्ये पहिल्यांदा आपली आणि बाळासाहेबांची इच्छापत्राच्या निमित्ताने भेट झाल्याचे न्यायालयाला सांगितले. आपले वरिष्ठ आणि सासरे अॅड्. जेरोम सलदाना यांचे अशील रवी ढोडी यांच्यामार्फत ही भेट झाल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. बाळासाहेबांना इच्छापत्र तयार करायचे असून त्याचा गाजावाजा होऊ नये किंबहुना ही बाब गोपनीय राहावी म्हणून त्यांना प्रसिद्ध नसलेल्या वकिलाकडून ते तयार करून घ्यायचे आहे, असे ढोडी यांनी बाळासाहेबांची भेट घडविण्यापूर्वी सांगितल्याचा दावाही डिसोजा यांनी केला. त्यानंतर सलदाना यांच्यासह आपण इच्छापत्राच्या निमित्ताने भेट घेतल्याचेही आणि पहिले इच्छापत्राचा आराखडा बाळासाहेबांनी तीन वेळा आपल्याकडून दुरुस्त करून घेतल्याचे डिसोजा यांनी सांगितले.
…अन् दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट, नेमकं काय घडलं होतं?
बाळासाहेब तपशिलाबाबत प्रचंड काटेकोर होते. त्याचमुळे इच्छापत्र त्यांच्या मनाप्रमाणे होईपर्यंत त्याचा आराखडा ते तयार करून घेत. १९९७ म्हणजेच बाळासाहेबांच्या पहिल्या इच्छापत्रापासून ते २०११ या त्यांच्या शेवटच्या इच्छापत्राचे काम आपणच केले. परंतु अंतिम इच्छापत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे आराखडे नष्ट करण्यास बाळासाहेबांकडून सांगितले जात असे. ही इच्छापत्रे आपण वाचून दाखविल्यावर ते स्वत:ही वाचत असल्याचा दावा डिसोजा यांनी जयदेव यांच्या वतीने केलेल्या आक्षेपानंतर केला. डिसोजा यांची उलटतपासणी अपूर्ण राहिल्याने १० डिसेंबर रोजी ती पुढे सुरू राहणार आहे.