शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पसरले. बहुतांश भागातील हॉटेल, दुकाने, टपऱ्या पटापट उस्फूर्तपणे बंद झाल्या आणि काही वेळात मुंबईतील सर्व व्यवहार थंडावले. शिवसेना कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनाही भावना आवरणे कठीण झाले होते. शोक अनावर झालेल्या शिवसैनिकांनी गोवंडी ते मानखुर्द दरम्यान रेल्वेमार्गावरील वाहतूकच रोखून धरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर मुंबईकर सुन्न झाले आणि शहरभर सन्नाटा पसरला. दुकाने बंद झालीच, पण रिक्षा-टॅक्सीसह रस्त्यावरील वाहतूकही अगदी तुरळक होती. अनेक खासगी कार्यालयेही लवकर सोडण्यात आली. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट होता. सर्वत्र शिवसेनाप्रमुखांच्या निधनाचीच चर्चा होती. हार्बर मार्गावर सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखल्याने अर्धा तास ती बंद राहिली. मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी सायंकाळी वाढली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वातावरणात तणाव होता. मातोश्री निवासस्थान परिसरातील सर्व रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले. ती अन्य मार्गाने वळविण्यात आली.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची बातमी पसरल्यावर शोकाकुल कार्यकर्त्यांनी मातोश्री निवासस्थानी धाव घेण्यास सुरूवात केली. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी उसळल्याने उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. गाडय़ा उशिराने धावत होत्या. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या उपनगरी गाडय़ा वांद्रे येथे रिकाम्या होत होत्या. शेकडो कार्यकर्त्यांच्या झुंडी मातोश्रीच्या दिशेने जात होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेगाब्लॉक रद्द
मुंबईच नव्हे तर देशभरातून हजारो शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे ठाकरे यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाने रद्द केला आहे.

बेस्टतर्फेही जादा गाडय़ा
शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारी वाहनांनी प्रवास करावा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘बेस्ट’नेही शिवाजी पार्कला जाण्यासाठी मुंबईतील सर्व आगारांतून विशेष बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  कोकणातून मुंबईत येणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने शनिवारी रात्री मडगावहून सीएसटीकरिता विशेष पॅसेंजर गाडी सोडली.

‘शांतता आणि संयम बाळगा!’
मुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांनी शांतता व संयम बाळगावा, भावनेच्या भरात कोणतेही अविवेकी कृत्य करू नये, शांतता राखावी व हिंसक कारवाया घडतील असे काहीही करू नये, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुखांनी निष्ठा व संयम यासाठी आपले जीवन वाहिले. आता कोणताही अनुचित प्रकार होणार नाही हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव अंत्यादर्शनासाठी शिवाजी पार्क येथे रविवारी सकाळी दहापासून सायंकाळी पाचपर्यंत ठेवण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. सकाळी सात ते दहा या वेळेत वांद्रे ते शिवाजी पार्क अशी बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघणार असल्याने या वेळेत पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

चित्रपटांचे खेळ नाहीत
मुंबईतील चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स रविवारी बंद राहणार असून कोणत्याही चित्रपटाचा एकही खेळ होणार नाही.

परीक्षा पुढे ढकलल्या
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील विविध पदांसाठी रविवार, १८ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. माहिती अधिकारी, माहिती सहायक, चित्रकार, वाहनचालक, चित्रपट जोडणीकार, कनिष्ठ तांत्रिक सहायक, शिपाई, वरिष्ठ दूरचित्रवाणी यांत्रिक या पदांसाठी ही परीक्षा रविवारी होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे महासंचालनालयातर्फे कळवण्यात आले आहे.

सकाळी. ७ वा. ‘मातोश्री’वरून सुरुवात
– कलानगर, पश्चिम द्रुतगती मार्गे, माहीम जंक्शन, लेडी जमशेदजी मार्गाने शिवाजी पार्क
 
अंतिम दर्शनासाठी व्यवस्था
– मीनाताई ठाकरे पुतळा आणि समर्थ व्यायाम मंदिर येथून प्रवेश (समर्थ व्यायाम मंदिर येथून महिलांसाठी स्वतंत्र रांग)

वाहतुकीसाठी रस्ते बंद
मोरी रोड ते वीर सावरकर मार्ग आणि अ‍ॅनी बेझंट मार्ग ते बाबासाहेब वरळीकर चौक
लेडी जमशेदजी मार्ग आणि गोखले रोड दादर टीटी ते टिळक उड्डाणपूल

गाडय़ा उभ्या करण्यास मनाई
वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, न. चिं, केळकर मार्ग, गोखले मार्ग, केळुसकर मार्ग, लेडी जमशेदजी रोड, कटारिया मार्ग, सयानी मार्ग.

बंदोबस्त
 २० हजार पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या १५ तुकडय़ा, तीन शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक (मातोश्री, सेना भवन व शिवाजी पार्क)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death maharastra in sad mood
First published on: 18-11-2012 at 03:44 IST