महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या आणि संरक्षित हेरिटेज स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाने समोर आणला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी महाराष्ट्र सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याची घणाघातही अखिल चित्रे यांनी केला आहे.
काय आहे अखिल चित्रे यांची पोस्ट?
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिका परवानगी देतेच कशी? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे… हेच महाराष्ट्र भाजपाचं काम आहे. भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती !
१६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची घटना
मुंबईतली ही घटना १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असून स्थानिक रहिवाशांनीच व्हिडिओ शूट केल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे. या प्रकरणावर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राज्य सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वांद्रे किल्ल्याचा इतिहास काय आहे?
वांद्रे किल्ल्याला कॅस्टेला डी अगुआडा असेही म्हटले जाते, १७ व्या शतकातील इतिहास आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला, सागरी धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आणि या प्रदेशातील पोर्तुगीजांचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर सामरिकदृष्ट्या स्थित होता, ज्याला तेव्हा बॉम्बे म्हणून ओळखले जाते. बांधकामाची नेमकी तारीख अनिश्चित आहे, परंतु ऐतिहासिक नोंदी असे सूचित करतात की हा किल्ला भारतीय किनारपट्टीवर पोर्तुगीज वसाहती विस्ताराचा भाग म्हणून १६४० च्या बांधला गेला. पोर्तुगीज भाषेत “कॅस्टेला डी अगुआडा”, ज्याचा अर्थ “वॉटरपॉईंटचा किल्ला” असा होतो. आज वांद्रे किल्ला मुंबईच्या वसाहती भूतकाळाचा आणि स्थापत्य वारसा म्हणून उभा आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक प्रतीक म्हणून काम करतो आहे.
