मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल टर्मिनसचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील ४.८ हेक्टर जागा मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)  नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) हस्तांतरित करण्यात आली आहे. 

मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८.१७ किमीच्या बुलेट ट्रेनला गती देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या जात आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भूसंपादनाचा विषय ३० सप्टेंबपर्यंत मार्गी लावण्यात यावा, असे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

या आदेशानंतर मंगळवारी एमएमआरडीएकडून वांद्रे-कुर्ला संकुल येथील टर्मिनसची जागा एनएचएसआरसीएलला हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. बीकेसीतील एमएमआरडीएच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली.

टर्मिनससाठी एनएचएसआरसीएलने वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील ४.८ हेक्टर जागा एमएमआरडीएकडे मागितली होती. मात्र या जागेवर एमएमआरडीएकडून करोना केंद्र उभारण्यात आले होते. करोनाचा प्रभाव कमी होत नसल्याने केंद्र गरजेचे आहे, असे सांगून मुंबई महानगरपालिकेकडून करोना केंद्राची जागा परत केली जात नव्हती. सत्तांतरानंतर नव्या सरकारने बुलेट ट्रेनच्या कामांना वेग दिल्यानंतर पालिकेकडून जुलैमध्ये शेवटचे करोना केंद्र बंद केले आणि ती जागा रिकामी करून एमएमआरडीएला परत केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती जागा तात्काळ एनएचएसआरसीएलला देण्याचे निर्देश दिल्याने २४ तासांच्या आत एमएमआरडीएकडून जागेचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एनएचएसआरसीएललाही टर्मिनसचे काम सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग देता येणार आहे.