मुंबईः नोकरीच्या नावाखाली खासगी बँकेत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीची सायबर फसवणूक झाली. आरोपीने नोकरीसाठी मुलाखत घेण्याच्या नावाखाली तक्रारदाराची गोपनीय माहिती मिळवली. त्या आधारे मुलाखत सुरू असतानात त्यांच्या दोन क्रेडिटकार्डद्वारे खरेदी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार यांना २ ऑगस्टला एक संदेश आला होता. त्यात एका खासगी बँकेत नोकरी उपलब्ध असून त्या जागेसाठी अर्ज करायचा असेल, तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> रुग्णांचे लोंढे, पण मनुष्यबळाचे वांधे

तक्रारदार यांनी क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी १०० रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी एकदा क्रेडिट कार्ड व एकदा नेट बँकिंगद्वारे अर्जाची रक्कम भरण्याचा प्रयत्न केला, पण व्यवहार झाला नसल्याचा संदेश त्यांना आला. त्यानंतर ते नोकरीसाठी अर्ज करत असलेल्या एका खासगी बँकेच्या प्रतिनिधीच्या नावाने त्यांना एक दूरध्वनी आला. कुणाल बन्सल नाव सांगणाऱ्या त्या व्यक्तीने तक्रारदार यांची गुगल मिटवर मुलाखत होईल, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यावर क्लिक केल्यावर समोर एक महिला तक्रारदार यांची मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होती. त्या महिलेने तक्रारदार यांना ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक विचारला. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीसाठी परवानगी देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना संदेश येण्यास सुरूवात झाली.

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानचे ‘शासकीय अतिथी’; गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनंतर प्रथमच मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखत सुरू असल्यामुळे तक्रारदार यांनी संदेश पाहिला नाही. तक्रारदार यांना पुन्हा संदेश आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांच्या दोन क्रेडिटकार्डवरून व्यवहार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ मुलाखत बंद करून तपासले असता त्यांच्या दोन क्रेडिटकार्डवरून साडेपाच लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. गुरग्राम येथे हे व्यवहार झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी तत्काळ बँकेत जाऊन क्रेडिटकार्डचे व्यवहार थांबवले व याप्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.