ऐन मान्सूनातही अन्नधान्यासह एकूण महागाईचे डोके वरच राहिल्याने पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या पतधोरणातही व्याजदर कपातीची शक्यता मावळली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सप्टेंबरमधील घाऊक तसेच किरकोळ महागाई दराने आधीच्या तुलनेत उचल खाल्ल्याने दिवाळीच्या तोंडावर सामान्य कर्जदारांना अपेक्षित असलेला व्याजदर कपातीचा बोनस दुरावला जाण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ६.४६ टक्क्य़ांवर गेल्याने तसेच याच कालावधीत किरकोळ महागाई दरदेखील ९.८४ टक्क्य़ांवर असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कांदे, बटाटय़ासह भाज्या तसेच अन्य खाद्यान्नाचे पदार्थ परतीच्या पावसाच्या कालावधीतही चढे राहिले आहेत. किरकोळ महागाई दर ऑगस्ट तुलनेत काहीसा नरमला असला तरी अद्यापही तो दुहेरी आकडय़ानजीक आहे. तर ऑगस्टच्याच तुलनेत सप्टेंबरमध्ये किंचित का होईना वधारला आहे.
हे दोन्ही दर रिझव्र्ह बँकेच्या अनुक्रमे १० व ५ टक्के दराच्या आसपास रेंगाळत असल्याने यंदा व्याजदर कपातीस कमी वाव असल्याचे मानले जात आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन अर्धवार्षिक पतधोरण दिवाळीपूर्वी, २९ ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहेत. राजन यांनी दोनच दिवसांपूर्वी विकासापेक्षा महागाईला प्राधान्य दिल्याचा पुनरुच्चार केल्याने ही अटकळ अधिक गडद बनली आहे. राजन हे व्याजदरांत पाव टक्क्याची वाढ करतील, असा अनेक अर्थतज्ज्ञांचा सूर आहे.
* चांगल्या मान्सूनमुळे येत्या काळात अन्नधान्याच्या किंमती कमी होतील. मात्र, रुपयाच्या घसरणीनंतर तेलाचे आयातमूल्य आणि देशांतर्गत इंधनाच्या सवलतीतील विक्री यातील तफावत अद्याप भरून काढता आलेली नाही. तसेच रुपया अजूनही पुरता सावरला नसल्याने तेलासह अन्य वस्तूंच्या आयात किमतीसाठी जादा रुपये मोजावे लागणार आहेत.
* व्याजदरांत वाढ केल्यास आर्थिक व औद्योगिक विकासास मोठा धक्का पोहोचेल, अशी भीती उद्योगक्षेत्रातून व्यक्त होत आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाचा दर ४.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता.
गतवर्षीच्या तुलनेत दरांची चढण
कांदा ३२२.९४%
भाज्या ८९.३७%
फळे १३.५४%