लोकसभा निवडणुकांमध्ये पुरती धुळधाण उडाल्यानंतर आगामी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या नेत्यांना सामान्य लोकांमध्ये वावरताना साधेपणा जपण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यत जाऊन पक्षाच्या भूमिकेचा प्रचार करण्याचे आदेश पवारांकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. लोकसभा निवडणुकांतील निराशादायक कामगिरीनंतर पक्षात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत पवारांनी यापूर्वीच दिले होते.
देशातील भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांची रचना बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासुद्धा संघटनात्मक पातळीवर अगदी तळागाळापर्यंत पदे आणि जबाबदाऱ्यांच्याबाबतीत नियमितपणे खांदेपालट करण्याची गरज शरद पवारांनी व्यक्त केली. गाव आणि जिल्हा पातळीवरील संघटनेत अशाप्रकारचे बदल केल्याने राजकारणात नेतृत्वाची नवीन पिढी तयार होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या सूत्राचा पुनर्विचार करावा लागेल, अशी भूमिकाही पवार यांनी या बैठकीत मांडली.