दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या गरजेप्रमाणे पाणीपुरवठा केल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, या भीतीने प्रशासनाने बियर उत्पादकांच्या पाणीपुरवठय़ावर बंधने आणली आहेत. साहजिकच, राज्यातील बियरचे उत्पादन चांगलेच घटले आहे.
एप्रिल-मे या हंगामात, जेव्हा कडक उन्हाळ्याने अंगाची काहिली होत असते, तेव्हा शहरी भागातील बियरची मागणी आणि खपही प्रचंड वाढतो. त्या काळातच राज्यातील पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होईल हे गृहित धरून काही उत्पादकांनी मात्र अगोदरच बियरचे वाढीव उत्पादन करण्याची चलाखीही दाखविली आहे. राज्यात औरंगाबाद जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर बियरचे उत्पादन होते. या परिसरात सहा मोठय़ा मद्यनिर्मिती कंपन्या आहेत.