राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने बसच्या टपावर झोपण्याची वेळ

मुंबई : मुंबईत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी ‘बेस्ट‘तर्फे  सेवा देण्यास आलेल्या एसटीच्या २०० हून अधिक चालक-वाहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. राहण्याची व्यवस्था नसल्याने चालक-वाहकांना बसच्या टपावर आणि बसखाली झोपावे लागले. त्यांच्या जेवणाचेही हाल झाले. टाळेबंदी शिथिल होताच शासकीय कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली आणि मुंबईत बेस्ट उपक्र माच्या बसगाड्यांना एकच गर्दी होऊ लागली. बेस्ट बस अपुऱ्या पडू लागल्याने एसटीची मदत घेण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत टप्प्याटप्यात जवळपास १००० एसटी मुंबईबाहेरून मागवण्यात आल्या असून आतापर्यंत ८०० गाड्या दाखल झाल्या असून दहा जिल्ह्यातून प्रत्येकी १०० एसटी मागवताना चालक-वाहकही येत आहेत. मुंबईत येणाऱ्या चालक-वाहकांनी आठ ते दहा दिवस काम के ल्यानंतर ते पुन्हा आपल्या जिल्ह््यात जातात आणि त्यांच्याजागी दुसरे चालक-वाहक येतात. या चालकांची मुंबईतील आगारांजवळ असलेल्या साध्या हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था के ली जाते. परंतु मंगळवारी दुपारी पुणे सांगली जिल्ह््यातून मुंबईत आलेल्या २०० हून अधिक चालक-वाहकांची ही व्यवस्था झालीच नाही आणि गैरसोयींना सामोरे जावे लागले.

राहण्याची व्यवस्था न झाल्याने मुंबई सेन्ट्रल आगारातील बसगाड्यांच्या टपावरच रात्रभर चालक-वाहक झोपी गेले, तर काही चालक-वाहक हे बसच्या खाली झोपल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्रभर मच्छर आणि मधूनच बरसणाऱ्या पावसामुळे अनेकांची झोपमोडही झाली. ही बाब कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना समजताच मध्यरात्रीपर्यंत त्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा के ली. बुधवारी सकाळी गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये  राहण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू होते.

‘चालक-वाहकांची राहण्याची-जेवणाची व्यवस्था करणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे. पण ती नीट पार पाडताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांत  जेवढे चालक-वाहक मुंबईत दाखल झाले त्यांना गैरसोयींनाच सामोरे जावे लागले. मंगळवारीही तीच परिस्थिती उद्भवली. त्यांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाने दूर कराव्या,’ अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी के ली.

मंगळवारी दाखल झालेल्या एसटी चालक-वाहकांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये के ली होती. परंतु हॉटेल प्रशासनाचा बुकिंग करताना गोंधळ उडाला. त्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था के ली. बेस्टच्या सेवेसाठी येणाऱ्या चालक-वाहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

  • शेखर चन्ने, व्यवस्थापैकीय संचालक, एसटी महामंडळ