प्रवाशांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी
मुंबई : प्रवाशांसाठी झटपट सेवा आणि बेस्ट उपक्रमाचा खर्च कमी करण्यासाठी मुंबईत विनावाहक बससेवा सुरू करण्यात आली. मात्र या योजनेमुळे प्रवाशीच नव्हे तर वाहकांनाही मनस्ताप होत असल्याचा आरोप करत शिवसेना, भाजप सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत गोंधळ घातला. आजघडीला मुंबईत ८६ मार्गावर ५४९ विनावाहक बससेवा सुरू असून यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी दिले.
बेस्ट उपक्रमाने ‘पॉइंट टू पाइंट’ विनावाहक बससेवा सुरू केली आहे. या सेवेत मधल्या मार्गावर बसगाडय़ांना थांबा नाही. पहिल्या थांब्यावरून बस निघण्यापूर्वी वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर काही मोजक्याच बस थांब्यांवर बस थांबविण्यात येते. तेथे उपस्थित वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर बस थेट शेवटच्या थांब्यावर पोहोचते. प्रवाशांना झटपट सेवा देण्यासाठी बेस्टने सुरू केलेली ही सेवा सध्या ८६ मार्गावर सुरू आहे. यामध्ये ४१ मार्गावर बेस्टच्या स्वमालकीच्या २२४ बस विनावाहक धावत आहेत, तर ४५ मार्गावर भाडेतत्त्वावरील ३२५ बस धावत असल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले. याविषयी गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
विनावाहक बसगाडय़ांच्या मागील दरवाजा बंद करण्यात येत असल्याच्या प्रकाराकडे भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी समिती सदस्यांचे लक्ष वेधले. बसगाडय़ांना एकच दरवाजा असणे, वाहक नसणे हे योग्य नाही. प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची टीका त्यांनी केली. यामुळे विनातिकीट प्रवासीही वाढले असून बेस्टचा महसूलही बुडत आहे. त्याचा आढावा बेस्ट उपक्रमाने घ्यावा. अशा प्रकारची सेवा देताना बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाडय़ांच्या रचनेत कोणताही बदल करू नये. यात अनेक त्रुटी असून विनावाहक बससेवा चालवू नका, अशी मागणी गणाचार्य यांनी केली. विनावाहक सेवेमुळे वाहकांची मोठी तारांबळ उडत असल्याची बाब समिती सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी निदर्शनास आणून दिले. या बसगाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एकाच ठिकाणी पाच ते सहा तास उभे राहावे लागते. यामुळे त्याला प्रसाधनगृहातही जाता येत नाही. त्यामुळे वाहकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही विनावाहक बसगाडय़ांमध्ये कमी प्रवासी असतात, तर काही गाडय़ांमध्ये प्रवासीच नसतात. मात्र पॉइंट टू पॉइंट सेवा देताना मधल्या थाब्यांवरून त्यांना नियमानुसार प्रवासी घेता येत नाहीत. परिणामी त्या थांब्यावरील प्रवासी ताटकळत राहतात. यात बेस्टचे नुकसानच होत असल्याची व्यथा शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी मांडली. या सेवा देताना प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन देतानाच बागडे यांनी सदस्यांच्या सूचनांची दखल घेत असल्याचे स्पष्ट केले.