५२ बसमार्ग बंद केल्यानंतर निर्णय; महाराष्ट्र दिनापासून सुरुवात
अपुरी प्रवासी संख्या आणि तोटय़ाच्या नावाखाली मुंबईतील ५२ बसमार्ग बंद करणाऱ्या ‘बेस्ट’ प्रशासनाने रोजच्या अर्थार्जनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर रविवारपासून चार नवीन वातानुकूलित बससेवा सुरू केल्या. एकीकडे ५२ बसमार्ग बंद करण्यावरून ओरड होत असताना वातानुकूलित मार्ग कितपत फायद्याचे ठरणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, बसमार्ग रद्द करण्याच्या निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत असली तरी तांत्रिक कारणांमुळे तीन महिने तरी हा निर्णय रद्द ठेवावा लागेल, असा दावा परिवहनमधील अधिकाऱ्यांनी केला आहे.
बेस्ट प्रशासनाने काही बसमार्गात बदल करण्याचे ठरवले आहे. या बदलानुसार काही नवीन बसमार्ग चालू करण्यात येणार असून काहींचा मार्गविस्तार होणार आहे. तसेच अत्यल्प प्रतिसाद असलेले काही बसमार्ग रद्द करण्यात आले आहेत. यात ४६ मार्ग उपनगरांतील असल्याने आजपासून उपनगरवासीयांची गरसोय होणार असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

नवीन बस मार्ग
वातानुकूलित बस मार्ग क्रमांक – एएस ७१ – मच्छीमारनगर माहीम ते मीरा रोड स्थानक (पूर्व). मच्छीमार बस येथून पहिली बस – सकाळी ७ वाजता तर शेवटची बस सायंकाळी ६.५० वाजता. तर मीरा रोड स्थानक येथून पहिली बस सकाळी ८.१० वाजता तर शेवटची बस रात्री ८.२० वाजता. ही सेवा संपूर्ण आठवडय़ाभरासाठी असून या बस गाडय़ांच्या फेऱ्या प्रत्येक ३० ते ४० मिनिटांनी असणार आहेत.
वातानुकूलित बस क्रमांक एएस ७२- लक्ष्मीबाई चौक- शीव रेल्वे स्थानक ते भाईंदर (पू). लक्ष्मीबाई चौक येथून पहिली बस सकाळी ७.०५ वाजता तर शेवटची बस सायंकाळी ६.१५ वाजता. तसेच भाईंदरहून पहिली बस सकाळी ८.३० वाजता तर शेवटची बस ७.५०
वाजता असणार आहे. ही सेवा संपूर्ण आठवडय़ाभरासाठी असून या बस गाडय़ांच्या फेऱ्या प्रत्येक ३० ते ४० मिनिटांनी असणार आहेत.
वातानुकूलित बस मार्ग क्रमांक एएस ३१०- वांद्रे (पूर्व) बसस्थानक ते वांद्रे (पूर्व) बस स्थानक (वर्तुळाकार) २ मेपासून. वांद्रे (पू.) बसस्थानक पहिली बस सकाळी ८.२० वाजता तर शेवटची बस सायं. ७.५५वाजता, तर डायमंड मार्केटहून पहिली बस सकाळी ८.३५ तर शेवटची बस ८.२५ वाजता. ही सेवा सोमवार ते शुक्रवारसाठी असून या बस गाडय़ांच्या फेऱ्या प्रत्येक १० ते १५ मिनिटांनी चालवण्यात येणार आहेत.
वातानुकूलित बस मार्ग क्रमांक एएस ४१५- आगरकर चौक ते सीप्झ बस स्थानक. आगरकर येथून पहिली बस सकाळी ८.३५ वाजता तर शेवटची बस सायंकाळी ६.५५ तर सीप्झहून पहिली बस सकाळी ९.०५ तर सायंकाळी ६.२५ वाजता.