महापालिकेकडून मदत मिळाली नाही तर १ एप्रिलपासून बसचे किमान भाडे दोन रुपयांनी वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बेस्ट महाव्यवस्थापकांकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले. पालिकेकडून १५० कोटी रुपयांची मदत मिळाल्यास किमान भाडे एक रुपयाने तरी वाढेल. मंगळवारी बेस्ट समितीमध्ये झालेल्या चर्चेत परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढीवर चर्चा करण्यात आली.
बेस्टच्या परिवहन विभागाला २०१३-१४ मध्ये ८९६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात हा तोटा ७७७ कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पालिकेकडून मदत मिळाली नाही तर हा तोटा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा कमी करण्यासाठी १ एप्रिलपासून तिकीट दरवाढ करण्याबाबत बेस्ट महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता मंगळवारच्या चर्चेअंती ठाम राहिले. पालिकेने १५० कोटी रुपयांची मदत केली, तर किमान भाडे सहावरून सात रुपये केले जाईल. मात्र पालिकेकडून मदत मिळाली नाही तर सहाऐवजी आठ रुपये तिकीट दरवाढ करणे अनिवार्य ठरेल, असे गुप्ता म्हणाले. बेस्टने दरवाढीचे दोन तक्तेतयार ठेवले आहेत. पालिकेने मदत केल्यास कमी दरवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॅलिडेटर लावण्याचा प्रयोग
बसमधून चढता-उतरताना व्हॅलिडेटरसमोर स्मार्ट कार्ड धरून तिकीट काढण्याचा पर्याय प्रवाशांना २०१४-१५ या वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध होणार आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवर व्हॅलिडेटिंग यंत्र चालणार आहे. सुरुवातीला दार बंद होण्याची सोय असलेल्या वातानुकूलित बसमध्ये ही सुविधा असेल. त्यानंतर सर्व वातानुकूलित बसमध्येही हा प्रयोग करण्याबाबत बेस्टचा प्रयत्न राहील. या प्रयोगाबाबत गेली तीन वर्षे चर्चा सुरू होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best ticket fare will rise from april
First published on: 19-11-2014 at 03:03 IST