मुंबई ते उरण हे अंतर केवळ ३० मिनिटांत पार करता यावे यासाठी भाऊचा धक्का ते मोरा रो रो प्रकल्प मुंबई सागरी महामंडळाने सागरमाला योजनेअंतर्गत हाती घेतला असून या प्रकल्पातील मोरा जेट्टीच्या बांधकामाचे कार्यादेश पावसाळ्यापूर्वी देण्यात आले आहेत. आता पावसाळा संपल्याने येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.

हेही वाचा- सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तरीही १८७ जिल्ह्यात पाणी टंचाई, मोसमी पावसाच्या बदलत्या स्वरूपावर क्लायमेट ट्रेंडचा अहवाल

सागरमाला योजनेअंतर्गत नवीन जेट्टी बांधणे तसेच रो रो सेवा सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. या सागरमाला योजनेतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भाऊचा धक्का ते मोरा, उरण रो रो सेवा. या प्रकल्पांतर्गत मोरा येथे जेट्टीसह इतर सुविधांचे काम करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ८८ कोटी ७२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा २०१७ मध्ये केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र त्यास मंजुरी मिळण्यास ऑगस्ट २०२१ उजाडले. त्यामुळे प्रकल्पास विलंब झाला. मंजुरी मिळाल्यानंतर मात्र सागरी महामंडळाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राट अंतिम केले. जुलैमध्ये मोरा जेट्टीच्या कामासाठी मे. डी.व्ही.पी. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लिमिटेड कंपनीला कार्यदिश दिले.

हेही वाचा- दिवाळीत खासगी बस प्रवास महागला; मुंबई-नागपूर वातानुकूलित प्रवासासाठी चार हजार रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यादेश दिल्यानंतर तात्काळ कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र पावसाळ्यात काम करता येत नसल्याने ऑक्टोबरमध्ये कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता १५ दिवसात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान कामास सुरुवात झाल्यापासून दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन मोरा जेट्टी सुरू झाल्यानंतर तिथून रो रो सेवा सुरू होणार असून भाऊचा धक्का ते उरण हे अंतर यामुळे ३० मिनिटांत पार करता येणार आहे. हा उरणवासीयांसाठी, मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.