भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करत दलित पँथरच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे येथे रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ७ ते ८ कार्यकर्ते कल्याणहून सीएसटीएमकडे जाणाऱ्या ट्रॅकवर उतरले होते. परंतु, रेल्वे पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे याचा रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. सध्या रेल्वे वाहतूक सुरळित सुरू असल्याचे सांगण्यात येते.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जोपर्यंत अटक केली जात नाही. तोपर्यंत असेच आंदोलन केले जाईल व ते आणखी तीव्र स्वरूपाचे केली जाईल, असा इशारा दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी दिला. या कार्यकर्त्यांनी काळी वेळ रेल्वे रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे पोलिसांनी त्यांनी त्वरीत ताब्यात घेतले. सध्या रेल्वे वाहतूक सुरळित सुरू आहे. दरम्यान, कालच्या महाराष्ट्र बंद दरम्यान मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावरील विविध स्थानकांवर दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लोकल अडवल्या होत्या. त्यामुळे दुपारनंतर काही काळ रेल्वे वाहतूक खोळंबली होती.