मुंबई : मेट्रो मार्गिका ९ च्या तुळया उभारणीसाठी व इतर पायाभूत कामांसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड – भाईंदर स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री ०१.३० ते रात्री ३.१५ दरम्यान १.४५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री १.४५ ते रात्री ३ दरम्यान १.१५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या सलग तीन रात्री असणाऱ्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शेवटच्या लोकलसह अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.५८ वाजता चर्चगेट – विरार ही शेवटची लोकल सुटेल. चर्चगेट – भाईंदर ही शेवटची लोकल रात्री ११.३८ वाजता सुटेल. विरार – चर्चगेट ही शेवटची लोकल रात्री १२.०५ वाजता सुटेल. रविवारी रात्री १२.२० वाजता चर्चगेटहून विरारला जाणारी शेवटची लोकल सुटेल. विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची लोकल रात्री १२.०५ वाजता सुटेल. सोमवारी रात्री १२.२० वाजता चर्चगेटहून विरारला जाणारी शेवटची लोकल सुटेल. विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची लोकल रात्री १२.०५ वाजता सुटेल.