मुंबई: सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या ६५ अधिकाऱ्यांपैकी कोणतेही आरोप नसलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा गुन्हे शाखेत घेण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर गुन्हे शाखेची प्रतिमा डागाळली होती. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्या अंतर्गत गुन्हे शाखेतून ६५ अधिका-यांची तात्काळ बदली करण्यात आली होती. तसेच यापूर्वी गुन्हे शाखेत पाच वर्षे काम केलेल्या अधिकारी व अंमलदारांना पुन्हा गुन्हे शाखेत न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मार्च महिन्याच्या शेवटी गुन्हे शाखेत इच्छुक अधिकारी व कर्मचा-यांसाठी सहपोलिस आयुक्त(गुन्हे) कार्यालयातून संदेश देण्यात आला होता. त्यात गुन्हे शाखेत काम करण्यासाठी इच्छुक अधिकारी व कर्मचा-यांनी ३ एप्रिलपर्यंत सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय(प्रशासन) यांच्याकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आली होती. पण पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी गुन्हे शाखेत काम केलेल्या अधिका-यांनी मात्र अर्ज करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील गुन्हे शाखा खिळखिळी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

पण आता गुन्हे शाखा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून अनेक अनुभवी अधिकाऱ्यांना पुन्हा गुन्हे शाखेत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जात असून ती पडताळून कोणतेही आरोपी नसलेल्या व स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांनाच पुन्हा गुन्हे शाखेत घेतले जाणार आहे.

यापूर्वीही गुन्हे शाखेत अनुभवी अधिकारी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. पण महाविकास आघाडी शासनाच्या काळात ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे काही काळ ही प्रक्रिया थांबली होती. पण आता लवकरच गुन्हे शाखेत अनुवभवी अधिकाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.