डहाणू आगर येथे मुलाला शाळेत सोडण्यास गेलेल्या दुचाकीस्वाराचा विद्युतभारित तार कोसळल्याने धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.४५ वाजता घडली.
मनीष अनिल कर्नावट (वय ४०, रा. डहाणूगाव) असे मृताचे नाव आहे.    मनीष सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.  शाळेतून परतत असताना डहाणू शहरातील आगर येथे रस्त्यात पाणी साचलेल्या ठिकाणी विद्युतभारित तार पडली होती. तेथून जात असताना विद्युतप्रवाहाचा स्पर्श झाल्याने मनीष हे जागीच कोसळले. ही घटना काही नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिली, मात्र विद्युतप्रवाह सुरूच असल्याने त्याला वाचविण्याचे धाडस कोणी न दाखविले नाही. या वेळी मनीष यांचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप ठेवत संतप्त नागरिकांनी डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेतली. या वेळी  सहायक अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोवर मनीष यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केल्याने या भागात काहीकाळ तणाव पसरला होता. पोलिसांनी तसे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biker killed by electric shock
First published on: 16-06-2015 at 01:01 IST