|| प्रसाद रावकर

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात आणखी एक प्रकल्प

मुंबई : विजेपोटी येणारा मोठा खर्च आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन मुख्य संतुलन जलाशयावर २.५ मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पालिकेला ११ कोटी २३ लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे वीज खर्चात मोठी बचत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भांडुप संकुलात प्रतिदिन १,९१० दशलक्ष लिटर आणि मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत प्रतिदिन ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रांतील सयंत्र चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज भासते. भांडुप संकुलातील एकूण जोडणी विद्युत भार १३००० केव्हीए इतकी असून सध्या त्याची अधिकतम मागणी ७८०० केव्हीए इतकी आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रासाठी दर महिन्याला अंदाजे ५० लाख विद्युत युनिटस् विजेची गरज भासते. त्यासाठी दर महिन्याला साधारण साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च येतो. दिवसेंदिवस विजेची गरज वाढत असून त्यापोटी येणारा खर्चही वाढत आहे.

भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ३६५ एकर जागेवर उभे आहे. येथे महासंतुलन जलाशय, क्लोरिन संपर्क टाक्या, उदंचन केंद्र, प्रशासकीय इमारत, गाळणी सयंत्र इत्यादी विभागांच्या छतावर सौर उर्जानिर्मितीसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सौर ऊर्जा धोरणाचा आधार घेत मुंबई महापालिकेने भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील क्लोरिन संपर्क टाक्या व आसपासच्या परिसरातील मोकळ्या जागेवर २.५ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आणि तो १५ एप्रिल २०१८ रोजी कार्यान्वित केला. या प्रकल्पामुळे  जानेवारी २०२० पर्यंत ४६ लाख ७० हजार ४९५ युनिट वीज उपलब्ध झाली आणि त्यामुळे पालिकेच्या वीज खर्चामध्ये तीन कोटी ३९ लाख ७८ हजार ९३९ रुपये इतकी बचत झाली.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन मुख्य संतुलन जलाशयावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली असून तीन निविदाकारांपैकी निकषपूर्ती करणाऱ्या मिटकॉन कन्सल्टन्सी अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग सव्र्हिसेस कंपनीला ११ कोटी २३ लाख ६१ हजार रुपयांचे कंत्राट देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे.

२०१८ मधील प्रकल्प यशस्वी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील  मोकळ्या जागेवर २.५ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून  तो १५ एप्रिल २०१८ रोजी कार्यान्वित केला आहे.  या प्रकल्पामुळे  जानेवारी २०२० पर्यंत ४६ लाख ७० हजार ४९५ युनिट वीज उपलपब्ध झाली आणि त्यामुळे पालिकेच्या वीज खर्चामध्ये तीन कोटी ३९ लाख ७८ हजार ९३९ रुपये इतकी बचत झाली. ही बाब लक्षात घेऊन आता भांडुप संकुल येथील मुख्य संतुलन जलाशयावर २.५ मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विजेपोटी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊ शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.