अमित शहा यांची पदाधिकाऱ्यांना सूचना; शिवसेनेचे लोढणे नको
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यात सर्व छोटय़ामोठय़ा घटकांना संघटित करा तसेच पक्ष वाढीसाठी नेटाने प्रयत्न करा. आगामी निवडणुकीत शत प्रतिशत भाजपची सत्ता आली पाहिजे म्हणजे शिवसेना किंवा अन्य कोणाचेही ओढणे गळ्यात घेण्याची गरज भासणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांना शुक्रवारी ठणकावले.
तीन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शहा यांनी पक्षाचे मंत्री, खासदार आणि आमदारांशी संवाद साधला. शिवसेनेकडून सातत्याने अडवणूक केली जात असल्याचा तक्रारींचा सूर काही आमदारांनी लावला होता. त्यावर स्वबळावर लढून संपूर्ण भाजपची सत्ता हे ध्येय समोर ठेवण्याचे आवाहन शहा यांनी केले. महाराष्ट्रात भाजपला चांगले यश मिळेल. पण त्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन लोकांचे प्रश्न सोडवावे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, असा सल्लाही शहा यांनी दिला.
उत्तर प्रदेशात पक्षाने सर्व घटकांना बरोबर घेतले. बूथ पातळीवर पक्ष बांधला. त्याचा फायदा निवडणुकीत झाला. राज्यातही बूथ पातळीपर्यंत पक्षाची बांधणी करा. पक्षाची मजबूत बांधणी झाल्यास पक्षाला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाचे आमदार नसलेल्या किंवा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वा अन्य पक्षांचे आमदार असलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करा. पक्षाच्या आमदारांनी प्रत्येकी एक तर मंत्र्यांनी दोन विधानसभा मतदारसंघ दत्तक घेऊन तेथे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. राज्यसभेच्या खासदारांनाही मतदारसंघ वाटून घ्यावेत. पक्षाचे आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये लक्ष घातल्यास पुढील निवडणुकीत पक्षाला निश्चितच यश मिळू शकेल, असेही शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे होत असतात. पक्ष बांधणी करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन ‘सोशल इंजिनयरिंग’ केल्यास भाजपला त्याचा निश्चितच फायदा होईल. त्या दृष्टीने नेत्यांनी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत, असेही शहा यांनी बजावले.
मंत्र्यांच्या कामगिरीचा सारी माहिती आपल्याजवळ आहे. मंत्र्यांची कामगिरी अ, ब, क अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मंत्र्यांनी कामगिरीमध्ये सुधारणा करावी, असेही त्यांनी फर्माविले.
‘तेव्हा आपण कमी पडलो’
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला वातावरण अनुकूल होते. पण तेव्हा आपण काही प्रमाणात कमी पडलो. यामुळेच शिवसेनेची मदत घ्यावी लागली आहे. तसेच शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात. हे सारे टाळायचे असल्यास आतापासूनच जोर लावावा. स्वबळावर सत्ता नक्कीच मिळेल, असा विश्वास शहा यांनी नेतेमंडळींना दिला. मध्यावधी निवडणुकांच्या संदर्भात थेट उल्लेख शहा यांनी टाळला असला तरी दोनच आठवडय़ांपूर्वी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना मध्यावधी निवडणुका ह्य़ा शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असतील, असे स्पष्ट केले होते. स्वबळावर सत्ता कोणाचे ओढणे गळ्यात नको हा सारा शिवसेनेला सूचक इशारा मानला जातो. उद्या शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शहा यांच्या स्वागतानिमित्त लावलेल्या फलकांवर कारवाई
न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंबईमध्ये राजकीय फलकबाजीवर बंदी घातली आहे. असे असतानाही मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात झळकविण्यात आलेले फलक पालिकेने काढून टाकले. पालिकेची परवानगी न घेताच हे फलक झळकविण्यात आले होते.