मालाड मधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार आहे. त्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. आज संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे. देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

घटनास्थळी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अस्लम शेख जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलाला देत आहेत, असं आंदोलक म्हणाले. जेव्हा पर्यंत या संकुलाचं नाव बदललं जात नाही, तोपर्यंत या संकुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, त्यांच्या भूमीत टिपू सुलतान सारख्या व्यक्तीचं नाव देणं, म्हणजे अपमान आहे, तुम्हाला इथे हिंदूंना राहू द्यायचं नाही का, असा सवाल आंदोलकांनी केला.

अस्लम शेख हे अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांनी मालवणी परिसराचं पाकिस्तान केलंय. ते हिंदूंना या परिसरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. आंदोलकांनी बस थांबवत चाकातील हवा काढून टाकली. बसमधील प्रवाशांना रस्त्यावर थांबावं लागतंय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लावलेले बॅनर आणि फलक आंदोलकांनी फाडून टाकले आहेत. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया..

“मी आंदोलनस्थळी असून पोलिसांचा अत्याचार सुरू आहे. शरजील इमामसारख्या लोकांवर या महाराष्ट्रात कारवाई होत नाही, पण टिपू सुलतान यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून अत्याचार होतोय,” असं अतुल भातखळकर म्हणाले.

शिवसेनेची भूमिका काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“टिपू सुलतान यांच्या नावाचा कोणताही प्रस्ताव नाही. भाजपाकडून कारण नसताना महानगरपालिका निवडणुकांसाठी कांगावा सुरू आहे,” असं शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या.