काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाने एक दिवसाचा उपवास करायचे ठरवले आहे. मोर आणि लांडोर यांची स्पर्धा जणू काही सुरु आहे. देशातील मोठ्या वर्गाचे हाल आणि उपासमार थांबत नाहीत, त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशात या उपवास नाट्याने काय साध्य होणार? अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वीच शंकर चायरे या शेतकऱ्याने विष पिऊन आपले आयुष्य संपवले. तीन लाखांचे कर्ज, सततची नापिकी आणि नैराश्य यातून चायरे यांनी जगाचा निरोप घेतला. आत्महत्येपूर्वीच्या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतीसंदर्भातल्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चायरे यांनी म्हटले आहे. यावरूनही अग्रलेखात टीका करण्यात आली आहे.

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?
माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून यवतमाळचे एक शेतकरी शंकर भाऊराव चायरे यांनी आत्महत्या केली आहे. डोक्यावर असलेले तीन लाखांचे कर्ज आणि सततची नापिकी यामुळे कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. सरकारच्या फसव्या आश्वासनांचा हा पोलखोल आहे. राज्यात सर्वकाही आलबेल आणि आबादी आबाद आहे, असे मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमांतून सांगत असतानाच शंकर चायरे यांनी मृत्यूला कवटाळले. राज्यातील सत्ताधारी ज्याला ऐतिहासिक वगैरे म्हणतात, त्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, थांबण्याची लक्षणेही दिसत नाहीत. कारण सरकारच्या घोषणा तर फसव्या आहेतच, पण अंमलबजावणीच्या नावानेही सगळी बोंबच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे शंकर चायरेंसारख्या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख जमा झाले असते तर त्यांना कर्ज फेडता आले असते हे साधे गणित आहे. मात्र हे साधेसोपे गणितही केंद्र सरकार मागील तीन-साडेतीन वर्षांत सोडवू शकलेले नाही. म्हणजे आश्वासन दिल्याप्रमाणे बँक खात्यात १५ लाखही जमा होत नाहीत आणि जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफीचा लाभदेखील पदरात पडत नाही. नापिकी, रोगांची लागण यामुळे शेतातील पीक हातचे जाते. जे काही थोडेफार उरते त्याला हमीभाव मिळत नाही. ही स्थिती बदलण्याच्या स्वप्नाला भुलूनच २०१४ मध्ये विद्यमान राज्यकर्त्यांच्या पारड्यात मतांचे भरभरून दान पडले. मात्र तो टाकणारा शेतकरी शेवटी कोरडाच राहिला आणि केंद्रासह देशातील २१ राज्यांत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची तिजोरी मागच्या दोन वर्षांत गलेलठ्ठ फुगली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and congress fast is like race between peacocks criticized uddhav thackeray in saamna editorial
First published on: 12-04-2018 at 07:11 IST