आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर डोळा ठोवून काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही अनधिकृत झोपडय़ांना मागच्या दाराने संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मुंबई रेल्वे हद्दीतील २००० सालापर्यंतच्या अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांकडे मंगळवारी केली.
शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईतील खड्डय़ांपासून विविध प्रश्नांवर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना यापूर्वी इशारा दिला होता. प्रत्यक्षात इशाऱ्याची मुदत संपल्यानंतर भाजपने काहीही केले नाही. एकीकडे मतांवर लक्ष ठेवून मनसेला साद घालायची तर दुसरीकडे रेल्वे हद्दीतील अनधिकृत झोपडय़ांना विमानतळ परिसराप्रमाणे विशेष संरक्षण देण्याची मागणी करायची अशी दुटप्पी चाल शेलार यांच्या नेतृत्वाखाली खेळण्यात येत आहे. उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ७२ लाख प्रवाशांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली असली तरी खरा डोळा हा झोपडपट्टीतील मतांवर असल्यामुळे त्यालाच प्राधान्य देण्यात आले. शेलार यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता, किरीट सोमय्या, आमदार गोपाळ शेट्टी, योगेश सागर, मंगलप्रभात लोढा आदींनी रेल्वेमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली.