मुंबईमधील साकीनाका भागात महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक असे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आज ‘सामाना’मधून शिवसेनेने भाजपाला कठुआ व हाथरस प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. मात्र आता याच अग्रलेखावरुन  भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कठुआ व हाथरस प्रकरणाची आठवण करुन देत विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये कायद्याचेच राज्य असल्याचं सांगत नराधमावर कठोर कारवाई केली जाईल असं अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असं म्हणत या प्रकरणामध्ये विरोधी पक्षाने राजकारण करु नये असं ‘सामना’च्या अग्रलेखातून सूचित करण्यात आलं आहे. या अग्रलेखावरुन चित्रा वाघ यांनी थेट वृत्तपत्राच्या संपादिका असणाऱ्या रश्मी ठाकरेंना राऊतांचा संदर्भ देत प्रश्न विचारलाय.

नक्की वाचा >> “थोबाडीत मारली तरी…”; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधक, सत्ताधारी आमने-सामने

राऊतांवर टीका…

“संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत….एका महिलेवर अमानवीय अत्याचार झालेला आहे त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही,” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच “अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर ताई, घाबरू नका, चिंता करू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल असं म्हणत फक्त भावनिक भुरळ घालायची,” अशा शब्दांमध्ये वाघ यांनी राऊतांवर टीका केलीय. इतकचं नाही तर वाघ यांनी, “संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केंव्हापासून झालात?,” असा प्रश्नही उपस्थित केलाय. “तपास पुर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रेलखातून अत्याचार करणारा ‘एकच’ नराधम होता असे घोषीत करताय. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी आहे की ही विकृती आहे?”, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

रश्मी ठाकरेंना सवाल

त्याचप्रमाणे चित्रा वाघ यांनी, “मला ‘सामना’च्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करताहेत. तर तुम्ही अशा तालीबानी प्रवृत्तीच्या मुसक्या कधी आवळणार आहात?,” असा प्रश्न रश्मी ठाकरेंना विचारला आहे.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

लेखामध्ये काय आहे?

“मुंबईतील साकीनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार झाला. एका नराधमाने त्या महिलेवर निर्घृण हल्ला करून तिला ठार केले. या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. त्या अभागी महिलेस वाचविण्यासाठी पोलिसांनी व डॉक्टरांनी शर्थ केली, पण पीडितेचा मृत्यू झाला. बलात्कार करणारा नराधम कोणी मोहन चौहान हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या व त्याच्यावरील खटला ‘फास्ट ट्रक’ कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याला फासावर लटकवले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य असून असे निर्घृण कृत्य करणारे नराधम कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत. तरीही या सर्व प्रकरणावर राज्यातील विरोधी पक्षाने गदारोळ माजवला आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, कायद्याचा धाक नाही, अशी भाषा विरोधकांनी वापरली आहे,” असं या लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..”; संजय राऊत संतापले

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका

तसेच, “साकीनाक्याच्या आधी अमरावती, पुणे, नागपूर येथे अशा घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटना ही अस्वस्थ करणारी व संताप आणणारी आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेस कलंक लावणारी आहे. त्याविरोधात लोकांच्या मनात संतापाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. अशा घटना घडताच तेवढय़ापुरते वादळ निर्माण होते, मने सुन्न होतात व पुन्हा जगरहाटी सुरूच राहते. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळय़ांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱयात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणाऱयांना राजाश्रय होता व आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारने घाईघाईने जाळून पुरावाच नष्ट केला व तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिले जात नव्हते. हाथरस प्रकरणात ‘‘बलात्कार झालाच नाही हो!’’ असे योगींचे सरकार सांगत होते, ते शेवटी खोटे ठरले,” असं म्हणत लेखामधून महाराष्ट्रामधील सरकार हे अधिक तत्परतेने अशा प्रकरणांमध्ये कारवाईस टाळाटाळ न करता ठोस निर्णय घेतं असं सुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

हे सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. “राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक साकीनाका प्रकरणात ज्या तातडीने मुंबईत पोहोचले, ती तत्परता या आयोगाने हाथरसप्रकरणी दाखवली नव्हती. ‘कठुआ’ बलात्कार प्रकरणातही बलात्काराचे समर्थन करण्यासाठी एका राजकीय पक्षाचे लोक रस्त्यावर उतरले होते. कायद्याचा धाक नाही असे म्हणायचे असेल तर ते या अशा प्रकरणांत म्हणावे लागेल. साकीनाका प्रकरणात पोलिसांनी १० मिनिटांत आरोपीस गजाआड करून कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून दिले. मुळात हे जे विकृत नराधम असतात त्यांना कायदा वगैरे काही कळत नाही. त्यामुळे ही विकृती दिसेल तेथे ठेचून काढणे हाच उपाय योग्य ठरतो. साकीनाक्यातील पीडित महिलेस दोन मुली आहेत. त्या निराधार झाल्या आहेत. त्या मुलींच्या शिक्षणाची व पुढची जबाबदारी राज्य सरकार घेत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली हे सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय?,” असा प्रश्न विरोधकांना विचारण्यात आलाय.

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; शिवसेनेचा हल्लाबोल

हे प्रकरण न्यायालयावर सोडले पाहिजे

“राज्यात कायद्याचा धाक आहेच व राज्याला मनही आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अशा घटना वाढल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे हे कायद्याबरोबरच समाजाचेही काम आहे. साकीनाका प्रकरणाचा तपास खोलात जाऊन केला तर मुंबईत जौनपूर पॅटर्नने किती घाण करून ठेवली आहे ते लक्षात येईल. गुन्हा घडणाऱया प्रत्येक ठिकाणी पोलिसांना हजर राहणे शक्य नसते, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. त्यावरून काही लोकांनी वाद केला आहे. खासकरून राष्ट्रीय महिला आयोगाने पोलीस आयुक्तांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या पोलिसांनी चुकीचे असे काय सांगितले? लखनौ, पाटणा, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू पोलीस आयुक्तांचेही हेमंत नगराळे यांच्याप्रमाणेच मत असेल व ते बरोबर आहे. मुंबई पोलीस सावध व सक्षम आहेत आणि संपूर्ण समाजाचे गुन्हेगारीकरण झालेले नाही. पोलीस व समाजाचा एकमेकांवर विश्वास आहे. तो आहे तोपर्यंत कायद्याचे राज्य राहील. मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. या प्रकरणात असे दिसते की, पीडिता व आरोपीची आधीपासून ओळख होती, त्यातून मैत्री झाली व त्यातूनच ‘घात’ झाला. ज्याने घात केला त्याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयावर सोडले पाहिजे,” असं लेखात म्हटलं आहे.

राजकारण न करण्याचा सूचक सल्ला

“विरोधी पक्षनेते सांगतात त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कारण आरोपीच्या बचावासाठी किंवा समर्थनासाठी कोणी रस्त्यावर आलेले नाहीत. कठुआ व हाथरसप्रकरणी तसे घडले होते. कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. हे तपास पोलिसांनाच करावे लागतात. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला ‘ईडी’ वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chitra wagh slams shivsena mp sanjay raut asks cm uddhavs wife rashmi thackeray when will you ask raut to stop writing like taliban scsg
First published on: 13-09-2021 at 17:20 IST