मुंबई : पेगॅससच्या मुद्द्यावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्ते बुधवारी मुंबईत रस्त्यावर आमनेसामने आले. युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या दादर कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्तेही प्रत्युत्तर देण्यासाठी धावून गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांच्या नेत्यांना रोखून त्यांना व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेसने भाजपच्या दादर कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही तयारी केली होती. काँग्रेस कार्यकर्ते आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनारायण मंदिराजवळ जमले होते. त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाविषयी भाजप नेत्यांना ऑनलाइन संबोधित केले. त्यासाठी भाजप नेते मुंबई कार्यालयात होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली.
आमच्यावर कोणी गुंडगिरी करून हल्ला केला, तर संघर्ष करण्याची आमचीही तयारी आहे, कोणीही धमक्या देऊ नयेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी व आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने वातावरण तणावपूर्ण होते. भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून सिद्दीकी यांना ताब्यात घेईपर्यंत हटणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.
पोलिसांनी आमदार सिद्दीकी, लोढा व लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली.