उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी तीन घोटाळ्यांची माहिती देत त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु कऱण्यात आल्याचंही सांगितलं. याच्यासंबंधी संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यामध्ये हिंमत असेल तर बोलावं असं आव्हानही यावेळी त्यांनी दिलं. “ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. यासंबंधी मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,ठ अशी माहिती यावेली किरीट सोमय्या यांनी दिली.

“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन 2 कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊतांच्या आव्हानाला किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर; म्हणाले…
हे भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

“उद्धव ठाकरेंचा २८ नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पेश अजमेरा बिल्डरला ३४५ कोटी गिफ्ट म्हणून देण्यात आले. मुळ प्रश्न मी नाही तर उद्दव ठाकरे आणि संजय राऊत वळवत आहेत. अन्वय नाईक कुटुंबासोबत त्यांचे संबंध होते आणि आहेत. सातबारा खोटे आहेत असं उत्तर द्या ना,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन संजय राऊत तुमची महापालिका ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका,” असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. “मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचं तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’; म्हणाले…

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं. ४० पैकी ३० जमीन व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत का आहेत याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. ऱश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावं. आर्थिक व्यवहार करत आहेत याशिवाय मी काही आरोप केलेले नाहीत. मी फक्त खुलासा मागितला आहे. यांची उत्तर देण्याची हिंमत नाही. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रं चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा,” असं जाहीर आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

“उत्तरं देता येत नाहीत म्हणून शिव्या द्यायला निघाले आहेत ही तुमची संस्कृती आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जमीन खाल्ली. म्हाडाने नोटीस दिली आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर किरीट सोमय्यावर कारवाई करावी,” असंही ते म्हणाले आहेत. “ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचं नाही,” असं किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp kirit somaiya allegations on maharashtra cm uddhav thackeray sgy

ताज्या बातम्या