राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“२१ सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

“काहीही संबंध नसणारी दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचं नाव देतात याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मी पण महाराष्ट्र्चाचा एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचं प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचार आहोत,” असंही ते म्हणाले.

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट

“मुख्यमंत्र्यांचे इतर काही व्यवहार आहेत हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ते मित्र, नातेवाईक असू शकतात… पण आम्हाला त्याबद्दल सांगा. शेतजमिनीचा व्यवहार झाला की राज्यातील जनतेच्या लोकांचाय मनात अनेक शंका निर्माण होतात,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

“रेवदंडामध्ये माझ्या सासूरवाडीपासून थोड्या अंतरावर जमीन असल्याने मला याबद्दल माहिती आहे. मी यासंबंधी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो. रायगडचे एसपी जे अन्वय प्रकऱणाचा फेरतपास करत आहेत ते आर्थिक व्यवहार झाल्याचं माहिती नसल्याचं सांगतात. जिल्हाधिकारी आरटीआय करा माहिती काढतो सांगतात,” असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.