प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. अखेर बारा दिवसांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली. तळोजा तुरुंगातून त्यांची सुटका होताच ते पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी राणा दाम्पत्याला तुरुंगात दिलेला वागणूकीची तुलना इंग्रजांच्या काळातील तुरुंगवासाशी केली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, ‘रवी राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकला आणि इंग्रजांची आठवण झाली. इंग्रजांच्या काळातील जेलर कैद्यांसोबत काय करायचे? याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण रवी राणा यांना याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. रवी राणा यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसली तरी, त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते,’ असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

नवनीत राणा यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले की, नवनीत राणा यांना मणक्याचा जुना आजार होता. या आजाराबाबत सांगूनही प्रशासनाकडून त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना खाली बसवण्यात आलं. सात-सात तास रांगेत उभं केलं. त्यामुळे त्यांचा मणक्याचा त्रास वाढला आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उद्याही काही तपासण्या केल्या जातील. पत्नीला भेटल्यानंतर रवी राणा यांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू पत्नीबाबत असलेल्या चिंतेचे होते, असं किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शेकडो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर पहारा देत होते.

यावेळी राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. मागील बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत होतं. त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अखेर बारा दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya first reaction after meet with rana couple latest update rmm
First published on: 05-05-2022 at 19:22 IST