राज्यामध्ये मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा दिवसोंदिवस चिघळत चालला आहे. मुंबईमधील आझाद मैदान येथे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. असं असतानाच या ठिकाणी आत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता ते संतापले. नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पाकिस्तानात पाठवा असंही यावेळी नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असा शब्द आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना देऊन नितेश राणे आझाद मैदानामधून बाहेर पडत असतानाच प्रसारमाध्यमांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी नवाब मलिक यांनी केंद्रांने खासगीकरण केलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी भाजपाने रस्त्यावर उतरावे अशी टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना नितेश राणे चांगलेच संतपल्याचं दिसलं. नवाब मलिक यांचा एकेरी उल्लेख करत, नवाब मलिक गद्दार आहे. दहशतवाद्यांना साथ देणारे ते देशद्रोही आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच पुढे बोलताना, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, असंही नितेश राणे पुढे म्हणाले.
इतक्यावरच न थांबून मलिक यांचा एकेरी उल्लेख करत त्याला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या असंही नितेश राणे म्हणाले. नंतर पत्रकारांवर संताप व्यक्त करताना, तुम्ही पत्रकार मित्रसुद्धा कशाला त्यांची मुलाख घेता, असा प्रश्न विचारला. “उद्या मुंबईत बॉम्ब फोडला तर सर्वात पुढे नवाब मलिक असेल, अशा अतिरेक्यांची मदत करणाऱ्या देशद्रोहींना आधी हकलवलं पाहिजे,” असंही नितेश राणे म्हणाले.
तसेच मलिक यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान का देण्यात आलंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या प्रश्नाला आम्ही का उत्तर द्यायचं असा प्रतिप्रश्न नितेश यांनी केला. “त्याच्यावर (नवाब मलिकांवर) देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. त्याला हकला आधी इथून,” असं नितेश राणे म्हणाले.