भाजपचा निर्धार; ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू राहण्याचा विश्वास
‘मेट्रो-३’ हा भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कोणत्याही परिस्थितीत त्याचे काम नियोजित वेळेतच सुरू करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. शिवसेनेने काँग्रेसला हाताशी धरून ‘मेट्रो-३’साठी जागा देण्याबाबतचा फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा पालिका सभागृहात फेरविचारार्थ सादर करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी तीन महिने भाजपला वाट पाहावी लागणार आहे; परंतु तोपर्यंत ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कामाच्या नियोजित वेळापत्रकात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी पालिकेकडून १७ भूखंड देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये सादर केला होता. हा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी काँग्रेस सदस्यांना हाताशी धरून मंजूर करून घेतला होता. त्यावेळी शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. हा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर होताच शिवसेनेने भाजपचीच खेळी खेळत काँग्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
दफ्तरी दाखल केलेला हा प्रस्ताव पालिका सभागृहात फेरविचारार्थ सादर करता येतो. मात्र प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तीन महिन्यांनी मागणी केल्यानंतर तो सभागृहात सादर केला जातो. भाजपने मागणी करीत हा प्रस्ताव फेरविचारार्थ सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन महिने भाजपला वाट पाहावी लागणार आहे. मात्र उपसूचनेनुसार प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा ठराव रद्दबातल करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे ‘मेट्रो-३’च्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणावरून गुरुवारी पालिका सभागृहात शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.

‘मेट्रो-३’मुळे आरे कॉलनीमधील वृक्षांना धोका निर्माण होईल, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रस्तावात आरे कॉलनीतील भूखंडाचा उल्लेखच नव्हता. मग तो प्रस्ताव फेटाळण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे.
शिवसेनेने २०१० मध्ये ‘मेट्रो-१’ प्रकल्पासाठी पालिकेच्या के-पश्चिम विभागातील आंबिवली येथील एक भूखंड देण्याकरिता पुढाकार घेतला होता. मग शिवसेना ‘मेट्रो-३’ला विरोध का करीत आहे, असा सवाल करीत मनोज कोटक म्हणाले की, सुधार समिती आणि पालिका सभागृहात परस्पर विरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. विनाकारण विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या या पक्षांना मतदारांकडून निवडणुकीतच उत्तर मिळेल.