भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारच्या मागील २ वर्षांचं वर्णन करायचं असेल तर पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याभोवती फिरणारं सरकार असंच म्हणावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तसेच या २ वर्षांतील ७५० पेक्षा अधिक दिवसांमध्ये सरकार केवळ मंत्र्यांच्या पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवती फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

आशिष शेलार म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यानं वृत्तपत्रांमध्ये जाहिराती येत आहेत. महाविकासआघाची सरकारच्या २ वर्षांचं वर्णन करायचं असेल तर पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याभोवती फिरणारं सरकार असंच म्हणावं लागेल. या सरकारच्या काळात जनतेची कामं होणं अपेक्षित होतं, पण २ वर्षात ७५० पेक्षा अधिक दिवसात लोकांची कामं झाली नाही. हे सरकार केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याचभोवती फिरतंय.”

“गेली २ वर्षे सरकारच्या तीन पक्षांचा ३ पैशांचा तमाशा”

“एक प्रसिद्ध नाटक होतं ‘3 पैशांचा तमाशा’. या सरकारच्या तीन पक्षांचा ३ पैशांचा तमाशा गेली २ वर्षे सुरू आहेत. त्या नाटकामध्ये सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी अमर्याद आणि अमानुष पद्धतीचा वापर आणि दुःखाभोवतीची सहानुभुती असं या नाटकाचं कथानक होतं. आजच्या महाराष्ट्राची स्थिती देखील तशीच आहे. ही तीन नाती आणि तीन पक्ष यांचा सत्तेभोवतीचा लोभ, त्यातून संपत्तीचं निर्मिती आणि सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राला दुःख असं चित्र आहे. म्हणून हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार. हे सरकार जनतेभोवती केंद्रीत होण्याऐवजी पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवती केंद्रीत झालंय,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“देशभरात महाराष्ट्राचा परिचय दुर्दैवाने पुत्रप्रेमापोटी पार्टी, पेग आणि पेंग्विन असा”

आशिष शेलार म्हणाले, “एखाद्याला आपला पुत्र मोठा व्हावा, चांगलं काम करावं असं वाटत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. त्याला राजकारणात स्थिरावा, त्याच्या नेतृत्वात त्याला यश मिळावं यात काही चूक नाही. पण त्यासाठी महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम आणि निर्णय काय होते हे नीट पाहिले तर महाराष्ट्राची बदनामी यामुळे जास्त झाली का हाच सवाल निर्माण होतो. यामुळे महाराष्ट्राचा परिचय दुर्दैवाने पुत्रप्रेमापोटी पार्टी, पेग आणि पेंग्विन असा संपूर्ण देशभरात होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोविडच्या काळात उपनगरीय रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने पहिल्यांदा पब सुरू केले. मंदिरं उघडण्यासाठी लोकांनी आंदोलन केलं, पण सरकारची भूमिका मदिरालय सुरू करण्याची होती. सरकारी कार्यालयं उघडली जात नाहीत, पण रेस्टॉरंटच्या वेळा वाढवल्या जातात. आमचा याला विरोध नाही, पण प्राथमिकतेला विरोध आहे. म्हणून महाराष्ट्राची ओळख प पार्टी, पेग, पेंग्विन अशा दिशेने होतेय हे दुर्दैव आहे,” असंही शेलार यांनी नमूद केलं.