मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफीचा निर्णय लागू करणार का, असा सवाल करीत भाजप आमदार आशीष शेलार यांनी निवडणुकीच्या मुहूर्तावर केलेल्या घोषणांची खात्री नसल्याची टीका केली. निवडणूक जाहीरनाम्यातील घोषणा ‘ छपाईतील चूक ‘ असे निवडणुकीनंतर सांगणाऱ्या काँग्रेसबरोबर शिवसेना सत्तेत आहे. महापालिका निवडणूक असल्याने ठाणे, नवी मुंबईतील नागरिकांना मालमत्ता करमाफीचा लाभ मिळणार असेल, तर राज्यातील अन्य नागरिकांवर शिवसेना अन्याय करणार का, अशी विचारणाही शेलार यांनी केली. सरकारने नागरिकांना समान न्याय दिला पाहिजे. निवडणुका असलेल्या महापालिकांच्या क्षेत्रात मालमत्ता करातील माफीच्या निर्णयाची घोषणा करायची आणि निवडणुका झाल्यावर कराची बिले पाठवायची, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार आहे असा आरोप  शेलार यांनी केला.