मुंबई : गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप नेते कॅप्टन आर तमिळ सेल्वन यांची आमदारकी कायम राहणार आहे. त्यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली.
सेल्वन यांच्या आमदारकीला निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. तथापि, ही याचिका अस्पष्ट असून त्यात सामान्य युक्तिवादांचा समावेश आहे. सबळ आणि ठोस तथ्यांचा त्यात अभाव असल्याचेही सकृतदर्शनी दिसून येते. याउलट, सेल्वन यांनी त्यांच्या निवडणूक अर्जात काही माहिती उघड न केल्याने निवडणुकीच्या निकालावर कसा परिणाम झाला याबाबत याचिकेत काहीच नमूद नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने सेल्वन यांना दिलासा देताना नोंदवले.
शीव कोळीवाडा विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार गणेश कुमार यादव यांनी सेल्वन यांच्या निवडीला आव्हान दिले होते व त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. सेल्वन यांनी त्यांच्या शपथपत्रात प्रमुख आर्थिक देणी उघड केली नाहीत आणि म्हणून त्यांना अपात्र ठरवावे, असेही याचिकेत म्हटले होते.
आर्थिक तपशीलात, ९० लाख रुपयांचे गृहकर्ज आणि ८६ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी, २.७५ कोटीं रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दोन लवाद निवाडे आणि सुमारे ७० लाखांच्या कर्जासाठी हमीदार असणे यासारख्या बाबीचा समावेश असल्याचा दावाही यादव यांच्यातर्फे युक्तिवादाच्या वेळीत करण्यात आला होता. तर याचिकेत ठोस तथ्यांचा अभाव आहे आणि कथित माहिती दडपण्याचा निवडणूक निकालावर कसा परिणाम झाला हे उघड करण्यात आलेले नाही, असा प्रतिदावा करून यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेला विरोध करताना सेल्वन यांनी केला होता. तसेच गृहकर्ज आपल्या मुलीने घेतले असून लवादामधील प्रकरणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सेल्वन यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु, सेल्वन यांच्यातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद मान्य करून यादव यांची याचिका फेटाळली.