दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. दरम्यान यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!”.

दरम्यान यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण न देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”.

संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या उपस्थितांसह कार्यक्रम पार पडेल आणि त्याचं ऑनलाइनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरी देण्यात आली आहे. महापौर निवासात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. इमारतींचे बांधकाम, वाहनतळ, उद्यान आदी कामे करण्यात येतील,. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या स्मारकासाठी सुरुवातीचा खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून केला जाईल.