शुक्रवारी वा शनिवारी शपथविधी? शिवसेनेपुढे नमते न घेण्याचा पक्ष नेतृत्त्वाचा संदेश
जनादेश लक्षात घेता सरकार स्थापण्याची तयारी भाजपने केली आहे. यानुसार शिवसेनेच्या मदतीने किंवा अल्पमतातील सरकार स्थापन करण्याची योजना आहे. शुक्रवारी वा शनिवारी शपथविधी पार पाडला जाईल, अशी शक्यता आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सोमवारी मुख्यमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असता राज्यात सरकार स्थापन करण्याची सूचना भाजप नेतृत्वाने केली आहे. शिवसेनेकडून आतापर्यंत दररोज भाजपवर हल्ले चढविले जात असताना भाजपने संयम पाळला होता. पण मुख्यमंत्र्यंच्या दिल्ली भेटीनंतर परिस्थिती बदलली. शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा द्या, पण त्यांच्यापुढे झुकू नका, असा स्पष्ट संदेश भाजप नेतृत्वाने दिला. यातूनच मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही समझोता किंवा अडीच वर्षे वाटून घेण्याचे आश्वासन दिले जाणार नाही.
मावळत्या विधानसभेची मुदत येत्या रविवारी संपुष्टात येत आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना राजीनामा सादर करून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार बघावा लागेल. सरकार स्थापण्याकरिता कोणतीही कालमर्यादा नसली तरी जास्त विलंब होत असल्याने भाजपला टीकेचा सामना करावा लागत आहे. यातूनच सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची शक्यता काँग्रेसच्या विरोधाने मावळली आहे. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. अशा वेळी शिवसेना जास्त ताणून धरणार नाही, असे भाजपचे गणित आहे.
शिवसेनेबरोबर मध्यस्थाच्या माध्यमातून सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेनेला जास्त मंत्रिपदे आणि खाती देण्याचा प्रस्ताव भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कसा काय प्रतिसाद मिळतो यावर भाजप नेत्यांचे लक्ष आहे.
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, असे विधान दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याने शिवसेनेत नाराजी होती. उद्धव ठाकरे हे या विधानामुळे संतप्त झाले होते. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रपती राजवटीचा पर्याय खुला
शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावा करण्याकरिता पत्र द्यावे, असा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेने ताणून धरल्यास भाजपकडून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. शुक्रवारी किंवा शनिवारी शपथविधी उरकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २०१४ मध्येही फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतातील सरकार स्थापन करण्यात आले होते. याच धर्तीवर सरकार स्थापन करण्याची योजना आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या मुदतीपर्यंत शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सेनेकडून फारच टोकाची भूमिका घेतली गेल्यास राष्ट्रपती राजवटीचा पर्याय भाजपसमोर आहे.
‘राऊत यांना आवरा’
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दररोज वृत्तवाहिन्यांना देत असलेल्या मुलाखतींमुळे युतीतील वातावरणात बेबनान निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राऊत यांना आवरावे, अशी भाजपची अपेक्षा आहे. राऊत यांच्या भाजप विरोधी भूमिकेमुळे बाहेर नाहक चुकीचा संदेश जात असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
