सुशोभीकरणाद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या मध्यवर्ती असल्याने लाखोंच्या संख्येने येणारे प्रवासी, पादचारी, फेरीवाले यांच्या कलकलाटामुळे घुसमटणाऱ्या दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुशोभीकरणाच्या निमित्ताने घुसण्याची तयारी भाजपने चालविली आहे. दादरकर वास्तुरचनाकारांच्या मदतीने दादर रेल्वे स्थानक आणि पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलाला आगळेवेगळे रूप देण्यासाठी भाजपने आराखडा तयार केला असून तो नुकताच पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. मागील पालिका निवडणुकीत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’कडे (मनसे) गेलेला आपला गड यंदा पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे; परंतु या दुहेरी निवडणुकीत आता भाजपनेही शिरकाव केल्याने पुढील वर्षी या परिसरात होणारी लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने दादर महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरांतून मोठय़ा प्रमाणावर नागरिक दादर परिसरात कामानिमित्त येतात. शिवाय येथील भाजी आणि फुलबाजारातही प्रचंड वर्दळ असते. त्यात फेरीवाल्यांची भर पडते ती वेगळी. त्यामुळे येथे वाहतुकीचेही तीनतेरा वाजलेले दिसतात. त्यातही पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर संपूर्ण परिसरातील वाहतुकीवर परिणाम होतो. म्हणून दादरमधील वास्तुरचनाकार उदय दिघे आणि रोहित कात्रे यांनी

अनुक्रमे दादर रेल्वे स्थानक व टिळक पुलावरील गर्दी निवळावी यासाठी आराखडा तयार केला आहे.

रेल्वे स्थानकावरच दोन-तीन मजले उभारून त्यात विविध सुविधा उपलब्ध करण्याची ही योजना आहे. अशाच पद्धतीने टिळक पुलाचाही विकास करण्याचा विचार आहे. यामुळे प्रवासी, पादचाऱ्यांसाठी वरच्या मजल्यावर फुडबाजार, फेरीवाला क्षेत्र, वाहनतळ आणि अन्य सेवा उपलब्ध होतील. त्यामुळे पदपथ मोकळे होतील आणि दादरचा परिसर मोकळा होऊन गर्दीत गुदमरणाऱ्या दादरकरांना मोकळा श्वास घेता येईल.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत या वास्तुविशारदांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त अजोय मेहता यांना या आराखडय़ाचे सादरीकरण केले. त्या वेळी पश्चिम आणि पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापकही उपस्थित होते. खासगी सहभागातून ही योजना राबविण्याचा विचार आहे.

तिरंगी लढत?

दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील निवडणुकीत मनसेने चारीमुंडय़ा चीत करीत तो हिरावून घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे या वेळी तो पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे दादरमधील वर्चस्व प्रस्थापित करण्याचे मनसेने आटोकाट प्रयत्न सुरू आहेच. या लढाईत आता भाजपनेही सुशोभीकरणाच्या निमित्ताने उडी घेतल्याने येथील आगामी पालिका निवडणुका रंगतील अशी चर्चा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp proposes beatification of dadar railway station ahead of bmc poll
First published on: 01-10-2016 at 01:58 IST