scorecardresearch

वीज देयक थकबाकीला भाजप जबाबदार ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रत्युत्तर; विधानसभेत गोंधळानंतर कामकाज तहकूब

शेतकऱ्यांची वीजजोडणी राज्यभरात तोडण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मुंबई:  शेतीपंपाच्या वीजबिल थकबाकीसाठी वीजजोडणी तोडण्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत विरोधी पक्ष भाजपने गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनाला ऊर्जा विभागच हरताळ फासत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर वीजबिल थकबाकी हे भाजपच्या सरकारचेच पाप असून त्यांच्याच काळात थकबाकी चौपट झाल्याची टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.

 शेतकऱ्यांची वीजजोडणी राज्यभरात तोडण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बीचे हाती येत असलेले पीक वाया जाण्याचा धोका आहे, याबाबत सत्ताधारी आघाडीचे कुणाल पाटील, नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकीची आकडेवारी मांडली. जानेवारी २०२२ मध्ये महावितरणकडील थकबाकीचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती खालावली आहे. कृषी थकबाकी वसुलीसाठी आणलेल्या योजनेत शेतकरी सहभागी होत आहेत. दंड व व्याजावरील सवलतीमुळे कृषीपंपांकडील वीजबिल थकबाकी ही ३० हजार ७४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरवठा बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असे राऊत यांनी सांगितले. तसेच २०१४ मध्ये असलेली वीजबिल थकबाकी ही भाजपच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात चौपट झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात चालू वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीज तोडण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. पण तरीही प्रत्यक्षात चालू वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज थकबाकी वसुलीसाठी तोडली जात आहे. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ फासत आहात, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारच्या या कारवाईविरोधात भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. गोंधळ थांबत नसल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp responsible for outstanding electricity bill energy minister nitin raut zws

ताज्या बातम्या