काँग्रेसला सर्वाधिक जागा; राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर; मंत्र्यांच्याच जिल्ह्यत धक्के
सव्वा वर्षांपूर्वी राज्याची सत्ता हस्तगत केलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका कायम ठेवता आलेली नाही. पाचही महानगरपालिकांमध्ये कामगिरी फारशी समाधानकारक नसताना रविवारी झालेल्या १९ नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. बिहार किंवा अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेसची कामगिरी सुधारू लागली आहे.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जामखेड नगरपंचायतीमध्ये २१ पैकी दहा जिंकून राष्ट्रवादीने बाजी मारली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील तीनपैकी दोन नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून, तिसऱ्या पालिकेत अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या नांदेड आणि रायगड जिल्ह्य़ांमध्ये यश मिळविले आहे. रायगड जिल्ह्य़ातील तळा आणि पोलादपूर पालिकांमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. माणगाव आणि म्हसाळामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. १९ पैकी सात नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून, अन्य तीन-चार ठिकाणी अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता मिळेल, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच आघाडीवर
१९ नगरपंचायतींमधील एकूण ३३१ पैकी सर्वाधिक १०४ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी (७८), शिवसेना (५७) तर सत्ताधारी भाजपला फक्त ३३ जागा मिळाल्या. मनसे (पाच) तर अपक्षांना ३४ जागा मिळाल्या. राज्यातील जनतेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात नाराजी असल्याचे लागोपाठ दोन टप्प्यांमध्ये झालेल्या नगरपंचायतींच्या निकालांवरून स्पष्ट झाल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. जनतेने राष्ट्रवादीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आभार मानले आहेत.
गेल्या महिन्यात ५९ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र चुरस झाली होती. तेव्हा भाजपला २५० तर काँग्रेसला २४० जागा मिळाल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये मात्र भाजपची पार पीछेहाट झाली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
नगर पंचायतींमध्ये भाजप चौथ्या स्थानी
१९ नगरपंचायतींमधील एकूण ३३१ पैकी सर्वाधिक १०४ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-01-2016 at 02:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp secured fourth place in maharashtra nagar panchayat elections