मुंबई : महायुती भक्कम असून आमच्यात काहीही बेबनाव नाही, अशी ग्वाही तिन्ही पक्षांचे नेते देत असले तरी स्वातंत्र्यदिनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद तर समोर आला. भाजपचे मंत्री, आमदार वा स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आरोप वा टीकाटिप्पणी केली. शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष्य करण्यात आल्याने यामागे काही वेगळी खेळी तर नाही ना, अशी शंका शिंदे गटाच्या नेत्यांना येऊ लागली आहे.

राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे वारंवार अनुभवास येते. गेल्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या भेटीत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे. त्यानंतर ध्वजारोहणसाठी रायगडमध्ये आदिती तटकरे यांनाच संधी देण्यात आल्याने शिंदे व त्यांचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते.

गणेश नाईक यांच्याकडून टीका

एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली होती. त्याचा आनंद आहे. पण कमाविलेले टिकविता आले पाहिजे असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये केले. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते असाही उल्लेख त्यांनी केला. या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वसई- विरारमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून माजी आयुक्तांवर कारवाई झाली त्याप्रमाणेच कारवाईच्या प्रक्रियेला बदलापुरात सुरुवात झाली आहे. जनतेच्या पैशांची चोरी खपवून घेतली जाणार नाही. पालिकेचा पैसा कुणाच्या घरात चालला आहे ते लवकरच कळेल. पालिका निवडणुकांत चौकाचौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार आहे, असा इशारा मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.

पालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. हे तत्कालीन सत्ताधारी सारे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. कथोरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले आहे. विकासकामांचे दहा दहा लाखांचे तुकडे केले जात आहेत. त्यातून बोगस कामे सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला. हा नागरिकांच्या मेहनतीचा कररूपातला पैसा कुणाच्याचा घरात जातो आहे. पालिका निवडणुकीवेळी चौकाचौकात हा उघड केला जाईल, असा इशाराही कथोरे यांनी या वेळी दिला.

शिंदेंच्याच मंत्र्यांकडून चौकशी

गडचिरोली येथे २०२१ ते २३ दरम्यान जिल्हा नियोजन विकास निधीतून शंभर कोटींचे औषध आणि साहित्य खरेदी करण्यात आले. या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीला केला. त्यावर सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, ही खरेदी प्रक्रिया एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्याच परवानगीने राबविण्यात आली होती. आता त्यांच्याच शिवसेनेच्या राज्यमंत्र्याने चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठावाड्यातही संघर्ष

मराठवाड्यातही भाजप आणि शिवसेनेत स्वातंत्र्यदिनी आरोप- प्रत्यारोप झाले. हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्यदिनी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप आरापे कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला. हा सरळसरळ भाजपच्या जिल्हाध्यक्षावर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केलेला गंभीर आरोप. त्यावर आपले पाप झाकण्यासाठी आमदार बांगर सध्या बेछूट आरोप करू लागले असल्याचा प्रतिआरोप घुगे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती. त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे. नरेश म्हस्के, खासदार, ठाणे बदलापूर व अंबरनाथमध्ये विकासकामांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. – किसन कथोरे, आमदार, भाजप