सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; भाजपकडून शपथविधीची तयारी सुरू

मुंबई : मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याच्या शिवसेनेच्या जाहीर भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समीकरणांबाबत चर्चा सुरू असल्या तरी ७ नोव्हेंबपर्यंत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

भाजपने शपथविधीची तयारी सुरू केली असून पक्षपातळीवर संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्याचे, मैदानाची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना दोन-तीन दिवसांत राजी होणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेचा आग्रह कायम असून शिवसेना मवाळ झाली या निव्वळ अफवा आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शुक्रवारी स्पष्ट केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह कायम असल्याने आता भाजप प्रसंगी एकटय़ाने सरकार स्थापन करणार का, असे विचारता, शिवसेनेचा समावेश असलेल्या सरकारचा शपथविधी होईल, असे उत्तर भाजपचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाची बोलणी लवकरच यशस्वी होतील आणि ७  नोव्हेंबपर्यंत महायुतीचे सरकार स्थापन होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्री पदाबाबत समान वाटय़ाचे ठरले नव्हते, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याकडे लक्ष वेधले असता, नाराजी आपल्या माणसावरच असते, ती दूर होऊ शकते, असे मुनगंटीवार म्हणाले. भावा-भावांमध्येही राजी-नाराजी सुरू असते. भाजप-शिवसेना हे भाऊ-भाऊ आहेत. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघेल आणि शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल. भाजप-शिवसेनेचे महायुतीचे सरकार ७ नोव्हेंबरच्या आत स्थापन होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजप-सेनेची युती निवडणूकपूर्व आहे. जनतेने महायुतीच्या सरकारला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्तेसाठी जाणे हे योग्य दिसणार नाही, असाही एक मतप्रवाह शिवसेनेतच आहे. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा नाही, विरोधात बसणार, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सातत्याने जाहीर करत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तसे जाहीर केले आहे. शिवाय, सध्याचे संख्याबळ पाहता राज्यात स्थिर सरकार हे भाजप व सेनाच देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात येऊ घातलेला राम मंदिराचा प्रश्न शिवसेनेच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे राम मंदिर, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज, स्थिर सरकारसाठी महायुतीला मिळालेला जनादेश व संख्याबळ अशा चारही गोष्टींमुळे लवकरच भाजप-शिवसेना सरकार स्थापन होईल, असे भाजपमधील नेत्यांना वाटते.