प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा; ५०० ठिकाणी यश
राज्यातील १३४६ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत ५०० हून अधिक ग्रामपंचायती भाजप कार्यकर्त्यांनी जिंकल्या आहेत, तर सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीपैकी माढा व माळशिरस नगर पंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवारांनी बहुमत मिळविल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायती भाजप कार्यकर्त्यांनी ताब्यात मिळवून अन्य पक्षांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावल्याचा दावाही त्यांनी केला.
पालघर जिल्ह्य़ातील २१० ग्रामपंचायती, धुळे जिल्ह्य़ात ३६, नंदुरबारमध्ये ५८, ठाणे जिल्ह्य़ात ८२, नांदेडमध्ये २८, यवतमाळमध्ये ३५ जिल्ह्य़ांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी यश मिळविले आहे. कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही प्रत्येकी एक जागा भाजपने जिंकली आहे. माळशिरस नगर पंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत तुकाराम देशमुख व संजीवनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने प्रत्येकी पाच म्हणजे १७ पैकी १० जागाजिंकल्या आहेत, तर माढा नगर पंचायतीमध्ये भाजपपुरस्कृत दादासाहेब साठे यांच्या पॅनेलने ११ जागाजिंकल्या आहेत.