मथुऱ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीच्या वेळी हॉटेलमधील खोलीत बोलावून अश्लील प्रश्न विचारणे तसेच पाठलाग केल्याची तक्रार एका महिला कार्यकर्तीने केल्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, मुंबईची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.
एका महिला कार्यकर्तीने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. या चौकशीत तथ्य आढळल्याने मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष गणेश पांडे यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली असून, पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केले.
महिलेच्या तक्रारीबाबत कोणतीही क्षमा नसून, यातूनच पक्षाने कठोर कारवाई केल्याचे शेलार यांनी सांगितले. गणेश पांडे यांच्या हकालपट्टीबरोबरच मुंबईची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली असल्याचे शेलार यांनी सांगितले. या कारवाईद्वारे शिस्तीबाबत कडक संदेश देण्यात आला आहे.