भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी १८ महिन्यांमधील पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली, तसेच महाराष्ट्राच्या जागांच्या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आली असून, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना तिच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत माध्यमांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत, की ज्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याबाबत महाराष्ट्रांच्या जागांच्या संदर्भात एक समिती तयार करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे त्याच्या समन्वयाचं काम पाहत आहेत. आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे हे आज त्या बैठकीसाठी आले होते. त्यामध्ये पुढील १७-१८ महिन्यांची रणनीतीबाबत चर्चा झाली. याचे जे प्रभारी आहेत, त्यांची काय भूमिका असणार आहे, त्यांनी कशाप्रकारे काम करायचं आहे याबाबत सगळी माहिती देण्यात आली. मला असं वाटतं की भाजपाचं हे एक नियमित काम आहे. २०१४ मध्ये निवडून आल्यानंतरही अशाचप्रकारे २०१६-१७ पासून एक नवीन मिशन आम्ही हातात घेतलं होतं, तसंच हे मिशन आहे. केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असं नाही. तर सातत्याने ती तयारी झाली पाहिजे आणि लोकांशी संपर्क असला पाहिजे. योजना लोकांपर्यंत पोहोचताय की नाही? लोकांना त्याचा लाभ मिळतोय की नाही? लाभधारकांशी संपर्क होतोय की नाही? अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत, की ज्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.”

४२ मतदारसंघ जिंकणे हे काही सोपं काम नाही, ते आम्ही जिंकलेलो आहोत –

तसेच, “जे मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत, त्यावर तर आम्ही लक्ष देतोच आहोत. परंतु आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहेत, असे देखील काही मतदारसंघ आम्ही निवडले आहेत आणि आज निवडलेल्या १६ मतदारसंघाच्या व्यतिरिक्त आठ मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. ४८ मतदारसंघात आम्ही ताकदीने लढू, या अगोदर आम्ही दाखवलेलं आहे. ४२ मतदारसंघ जिंकण हे काही सोपं काम नाही, ते आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की ४८ मतदारसंघात आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, प्रल्हाद पटेल अशा अनेक मंत्र्यांना काम देण्यात आलं आहे. जसं आता महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना केरळ, तामिळनाडूतही काम देण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील मतदारसंघात सगळे मंत्री जाणार आहेत.” अशी देखील माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.