फेब्रुवारीत यंदा कलाविष्कारांची प्रत्यक्ष अनुभूती 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : कलाविष्कारांची उधळण करणारा मुंबईतील नामांकित काळा घोडा महोत्सव ५ ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष होणार आहे. गतवर्षी करोनामुळे ऑनलाइन पद्धतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन यंदा महोत्सवाचे आकर्षण असणाऱ्या संकल्पनात्मक कलाकृती जमिनीपासून ठरावीक उंचीवर उभारण्यात येणार आहेत.

मुंबईतील काळा घोडा महोत्सवाला कलाक्षेत्रात मानाचे स्थान आहे.  चित्र, शिल्प, हस्त, नाटय़ , नृत्य. गीते अशा विविध कलांच्या संगमाचे दर्शन महोत्सवात घडते. येथे भरणाऱ्या कलायात्रेत मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून लाखो तरुण सहभागी होत असतात. गेल्या वर्षी करोनामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून पार पडलेला महोत्सव यंदा मात्र प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.

 यंदा या महोत्सवाची भव्यता अधिक वाढेल अशी तयारी आयोजकांनी केली आहे.  ‘उडान’ ही यंदाची संकल्पना  असून प्रयोगात्मक कलांचे सादरीकरण, संकल्पनात्मक कलाकृती प्रदर्शन आणि वर्षभर चालणारी खरेदी..विक्री असे स्वरूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील बाल संग्रहालय, कुमारस्वामी हॉल, अ‍ॅम्फी थिएटर, लॉन, हॉर्निमन सर्कल गार्डन, मॅक्सम्युलर भवन, किताबखाना यासह फोर्ट परिसरातील अन्य काही ठिकाणी महोत्सव होणार आहे.

 ‘उडान’ संकल्पना लक्षात घेऊन सजावट, प्रकाश योजना ‘एरियल व्हिज्युअल आर्ट्स इन्स्टॉलेशन्स’ पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संकल्पनात्मक कलाकृतीही याच पद्धतीने उभारल्या जातील. ज्यामध्ये जमिनीपासून काही उंचीवर याची मांडणी करण्यात येणार आहे. यामुळे रस्ते मोकळे राहतील आणि कलारसिकांना गर्दी न करता ते सहज पाहता येतील, असा आयोजकांचा उद्देश आहे.

याचाच भाग म्हणून काही इमारतींच्या दर्शनी भागावर भित्तीचित्रे रंगवली जाणार आहेत.  काळा घोडा महोत्सवात यायचे असेल तर यंदा पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी किती असावी याचे नियंत्रण आयोजकांच्या हातात असणार आहे. दोन लसमात्रा झालेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असून नोंदणीची प्रक्रिया आणि महोत्सवाचे तपशील येत्या काही दिवसात आयोजकांकडून जाहीर केले जातील. करोनाचे नियम लक्षात घेऊन विविध कलाकृतींच्या खरेदी-विक्रीची दुकाने यंदा प्रत्यक्ष महोत्सवात नसतील. मात्र त्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार असून १० डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२३ या एका वर्षांच्या कालावधीसाठी ही दुकाने ऑनलाइन माध्यमातून सुरु असतील.

महोत्सवातून उभारण्यात येणारा निधी युनेस्को पुरस्कारप्राप्त मुलजी जेठा फाउंटन, के. इ. सिनेगॉग आणि बोमनजी होर्मर्जी क्लॉक टॉवर यांसारख्या प्रकल्पांसह परिसर, आसपासच्या इमारती आणि वारसा स्मारकांच्या संवर्धनासाठी वापरला जाणार आहे.

वृंदा मिलर, संचालिका, काळा घोडा कला महोत्सव

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black horse art festival artist ysh
First published on: 09-12-2021 at 00:38 IST