मुंबईसह अन्य शहरांतील गरजूंना बेकायदा विक्री; पुरवठा-वितरणाचा हिशोब तपासणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रेमडेसिवीर औषधासोबतच सहज उपलब्ध न होणाऱ्या आणि करोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या टोसीलीझुमाबचाही (अ‍ॅक्टेमेरा) काळाबाजार केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. काळ्याबाजाराची पाळेमुळे खण्यासाठी उत्पादक कंपन्यांनी वितरकांना पुरावलेला औषधसाठा, त्याचे वितरण-विक्रीचा हिशोब यांचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनालायाने संयुक्त कारवाई करून रेमडेसिवीर पाच पट जास्त किमतीला विकणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक केली. सिप्ला आणि हेतेरो लॅब्स या कंपन्यांची १३ रेमडेसिवीर हस्तगत करण्यात आली. या टोळीने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील रुग्णांना २५ ते ३० रेमडेसिवीर पाचपट पैसे आकारून विकल्याची माहिती पुढे आली आहे.

गुन्हे शाखेने औषध उत्पादक कंपन्यांच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वितरकांकडे सहज उपलब्ध ना होणाऱ्या रेमडेसिवीर, टोसीलीझुमाबच्या वितरणाबाबतचे नियम किंवा प्रक्रियेबाबत चौकशी सुरू केली. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार सिप्ला कंपनीचे मुंबईत तीन वितरक असून एकाला रेमडेसिवीर थेट रुग्णांना विकण्याची परवानगी आहे. अन्य वितरकांना मात्र रुग्णालये आणि रुग्णांकडून (वैयक्तिक पातळीवर) आलेल्या मागणीनुसार रेमडेसिवीरचा मर्यादीत पुरवठा होतो. घाटकोपरच्या डेल्फा डिस्ट्रीब्युटर्स हे वितरक त्यापैकी एक. गुन्हे शाखेने अटक कलेल्या टोळीतील मुख्य आरोपी सुधीर पुजारी याच वितरकाकडे कार्यरत होता.

उत्पादक कंपनीकडून उपलब्ध झालेले रेमडेसिवीर यादीनुसार रुग्ण, रुग्णालयांना वितरीत करण्याची जबबादारी पुजारीवर सोपविण्यात आली होती. रुग्णाची खातरजमा करून रेमडेसिवीर पुरवायचे होते. तसेच त्याचा अहवालही उत्पादक कंपनीला द्यायचा होता. त्यामुळे गुन्हे शाखा डेल्फा डिस्ट्रीब्युटरचे मालक, प्रशासकीय विभाागाकडे रेमडेसिवीरचा पुरवठा, वितरणाचा हिशोब तपासणार आहे.

पुजारी याने दोन हजार रुपये दलाली घेऊन या टोळीला सुमारे १५ रेमडेसिवीर (सिप्ला कंपनीचे) उपलब्ध करून दिले होती. टोळीतील सात आरोपींनी प्रत्येक टप्प्यावर आपली दलाली जोडून रेमडेसिवीरची किंमत फुगवली होती. पुजारीने उत्पादक कंपनीने पुरवलेल्या यादीतील रुग्णांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून औषधे परस्पर आपल्या साथीदारांच्या हाती दिल्याचा संशय आहे. तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यादीतल्याच रुग्णांच्या हाती औषधे मिळाली का हे उत्पादक कंपनीने तपासले नसावे किंवा वितरकाने पाठवलेल्या अहवालातून ही बाब कंपनीच्या लक्षात आली नसावी.

अन्य उत्पादक कंपनी हेतेरोच्या वितरकांच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेची पथके शहराबाहेर असून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांची पुढील साखळी गुन्हे शाखेच्या हाती लागेल, असे संकेत आहेत.

९० हजार ते एक लाखात विक्री

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार करोना उपचारांसाठी वापरण्यात येणारी टोसीलीझुमाब औषधही महागडे असून बाजारात सहज उपलब्ध होत नाही. वितरकाकडून ते सुमारे ३० हजार रुपयांना विकले जाते. मात्र तुटवडा असल्याने गरजूंना ते काळ्याबाजारात ९० हजार ते एक लाख रुपये मोजून विकत घ्यावी लागते. या टोळीने रेमडेसिवीरसह टोसीलीझुमाबचाही काळाबाजार केला आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे.

खरेदीदारांचीही चौकशी

या टोळीकडून रेमडेसिवीर विकत घेणाऱ्यांचाही गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे. नाईलाज म्हणून नातेवाईक रुग्णासाठी रेमडेसिवीर विकत घेणाऱ्यांना साक्षीदार तर काळाबाजार सुरू ठेवण्याच्या उद्देशाने व्यवहार करणाऱ्यांना आरोपी केले जाईल, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black marketing of tocilizumab in mumbai zws
First published on: 22-07-2020 at 04:30 IST